घरमुंबईप्लास्टिक मुक्तीसाठी पालिका शाळा सरसावल्या

प्लास्टिक मुक्तीसाठी पालिका शाळा सरसावल्या

Subscribe

विद्यार्थ्यांना घर व परिसरातील प्लास्टिक जमा करण्याबाबत मार्गदर्शन

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी जाहीर केल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी आता मुंबई महापालिकेच्या शाळाही पुढे सरसावल्या आहेत. विद्यार्थ्यांमार्फत राबवलेल्या मोहिमेला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पालिकेने शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील, शेजार्‍यांकडील, परिसरातील प्लास्टिक जमा करून शाळेत आणण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. शाळेत आणण्यात आलेले प्लास्टिक घन कचरा व्यवस्थापन विभागाकडून नष्ट करण्यात येणार आहे.

एखाद्या मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती केल्यास त्याचे परिणाम समाजातील सर्व स्तरापर्यंत दिसून येतात. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली प्लास्टिक बंदीला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये यशस्वी व्हावी यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय पालिका शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना प्लास्टिक बंदी मोहिमेची माहिती व्हावी यासाठी पालिकेकडून शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कार्यशाळा घेण्यात येत आहेत. कार्यशाळेत सहभागी झालेले शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्लास्टिकचे दुष्परिणाम, त्यापासून निर्माण होणार्‍या समस्या, सरकारकडून राबवण्यात येत असलेली बंदी याबाबत माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती दिल्यानंतर विद्यार्थ्यांना देऊन त्यांना घरातील, शेजार्‍यांकडील व परिसरातील प्लास्टिक जमा करून ते शाळेत आणण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थ्यांनी जमा केलेले प्लास्टिक शाळेच्या स्टोर रूममध्ये जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाकडे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ते देण्यात येणार आहे. जेणेकरून मुंबईमधील प्लास्टिक बंदी मोहीम यशस्वी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पालिकेचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश चर्‍हाटे यांनी दिली.

- Advertisement -

अन्य शाळा व नागरिकांच्या पुढाकाराची अपेक्षा
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमार्फत प्लास्टिक विरोधात मोहीम राबवली जात असली तरी अन्य शाळाही या मोहिमेत सहभागी होऊ शकतात. शहरातील अन्य शाळांनी विद्यार्थ्यांमार्फत गोळा केलेले प्लास्टिक जवळच्या पालिकेच्या शाळेत जमा करू शकतात. तसेच नागरिकही आपल्या जवळच्या पालिकेच्या शाळेत प्लास्टिक जमा करू शकतात.

बंद केलेल्या शाळांचाही करणार वापर
विद्यार्थी व नागरिकांकडून जमा होणारे प्लास्टिक शाळेच्या स्टोररूमध्ये साठवण्यात येणार आहे. परंतु या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यास हे प्लास्टिक ठेवण्यासाठी पालिकेच्या बंद असलेल्या शाळांचाही वापर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोणतीही मोहीम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवल्यास ती नागरिकांपर्यंत लवकर पोहचते. लहान मुलांकडून चांगले कार्य होत असल्याने घरातील वडीलधारी मंडळी त्याला प्रोत्साहन देतात. त्याचप्रमाणे ते स्वत: त्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे प्लास्टिक बंदीसारखी मोहीम विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे.
– प्रकाश चर्‍हाटे, उपशिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -