घरमुंबईउडिसाच्या विद्यार्थिंनीना महाराष्ट्राची संस्कृती ओळख

उडिसाच्या विद्यार्थिंनीना महाराष्ट्राची संस्कृती ओळख

Subscribe

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’अंतर्गत एसएनडीटीच्या माध्यमातून कार्यक्रम

शेजारील राज्यांतील कला, संस्कृती आणि परंपरेची देवाणघेवाण व्हावी यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मार्फत देशामध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाला चर्चगेट येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकताच प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत उडीसामधील रमादेवी महिला विद्यापीठातील 10 विद्यार्थिनी व 2 शिक्षक डॉ. पटनाईक, डॉ. त्रिपाठी सहभागी झाले आहेत.

देशातील राज्यांमधील कला, संस्कृती आणि परंपरा जाणून घेत, एकोपा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक भारत, श्रेष्ठ भारत अभियान हाती घेतले. या अभियानाची सुरुवात 30 ऑक्टोबरला छत्तीसगडमधून झाली आहे. या अभियानात कॉलेजांनाही सहभागी करून घेण्याचे आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) दिले आहेत. यानुसार यूजीसीने देशभरातील सर्व विद्यापीठांना दिलेल्या निर्देशानुसार 4 नोव्हेंबरपर्यंत या अभियानाबाबत अ‍ॅक्शन टेकन अहवाल यूजीसीकडे सादर करावा लागणार आहे. यामध्ये दुसर्‍या राज्यांतील साहसी शिबिरे, नाट्य, भाषा, संस्कृती-परंपरा आणि राज्याची प्रमुख ओळख, घोषवाक्यांच्या शब्दांचे प्रकाशन, ऐतिहासिक सहलींचे आयोजन असे उपक्रम राबवावे लागणार आहेत.

- Advertisement -

एसएनडीटी विद्यापीठाने महाराष्ट्र व उडीसा राज्यातील विद्यार्थी प्रत्यक्षभेट तसेच समाजमाध्यमांचा वापर करून त्या राज्याची संस्कृती, भाषा, चालीरीती, लोककला तसेच ऐतिहासिक वास्तू यांचे अध्ययन करणार आहेत. या अभियानचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. या अभियानाचे प्रास्ताविक एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे नोडल अधिकारी प्रा. डॉ. आशा पाटील यांनी केले त्यानंतर त्यांनी व प्रा. डॉ. अर्चना भटनागर यांनी उडीसा राज्यातील रमादेवी महिला विद्यापीठातील दोन शिक्षकांचे स्वागत केले. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी रमादेवी महिला विद्यापीठातील 10 विद्यार्थिनीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. कार्यक्रमाच्या पुढे महाराष्ट्र व उडीसा राज्यातील लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले तसेच उडीसा राज्यातील विद्यार्थिनींनी त्यांची ओळख मराठी भाषेतून करून देण्याचा तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनींनी उडिया भाषेतून ओळख करून देण्याचा प्रयत्न केला.

सात दिवसांच्या अभ्यास दौर्‍यात रमादेवी महिला विद्यापीठातील विद्यार्थिनी व शिक्षक हे एसएनडीटी महिला विद्यापीठातील विविध विभागांना भेटी देणार असून त्या विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत तसेच मुंबई व आसपास असलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देऊन महाराष्ट्राची संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या अभियानामुळे दोन्ही राज्यातील विद्यार्थिनींमध्ये संवाद वाढीस लागून विविधतेत एकता ही संकल्पना दृढ होण्यास हे अभियान नक्कीच मदत करेल असा विश्वास प्रा.डॉ.आशा पाटील यांनी व्यक्त केला. या उद्घाटन कार्यक्रमात प्रा. डॉ. सोनाक्षी विचारे व प्रा.डॉ. महेश कोलतामे यांचे विशेष सहकार्य लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -