घरदेश-विदेशजवानांशी दुर्व्यवहार करणारा महाराष्ट्र सदनातील अधिकारी अखेर कार्यमुक्त

जवानांशी दुर्व्यवहार करणारा महाराष्ट्र सदनातील अधिकारी अखेर कार्यमुक्त

Subscribe

महाराष्ट्र सदनामध्ये जवानांशी दुर्व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बँड पथकातील जवानांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. तसेच कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मूळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळवण्यात आले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले होते.

तातडीने कारवाई करण्याचे निर्देश

महाराष्ट्र सदन येथे आज सकाळी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सैन्य दलाच्या गोरखा रेजिमेंटचे बँड पथक छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर पथकातील जवान सदनाच्या उपहारगृहातील एक्झिक्युटिव्ह डायनिंग हॉलमध्ये जेवणासाठी गेले. त्यावेळी सदनचे सहायक निवासी आयुक्त विजय कायरकर यांनी जवानांना तिथे बसण्यास विरोध केला. जवानांना बाहेरच्या सार्वजनिक डायनिंग हॉलमध्ये बसण्यास सांगितले आणि त्यांच्याशी हुज्जत घातली. यावर कार्यक्रम आयोजकांनी आक्षेप घेतला आणि ते जवानांसह सदनाबाहेर पडले. जवानांसोबत झालेल्या या दुर्व्यवहाराच्या प्रकरणाची माहिती मिळताच राज्याचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून माहिती घेतली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी संबंधित सहायक निवासी आयुक्तांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.

- Advertisement -

वाचा सविस्तर – शिवजयंतीला गालबोट; सैनिकांना जेवणाच्या ताटावरुन हाकललं!

कायरकर महाराष्ट्र सदनावर प्रतिनियुक्तीवर

त्यानुसार महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्तांनी आदेश काढून कायरकर यांना सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) पदावरुन कार्यमुक्त केले आहे. तसेच जवानांशी केलेल्या दुर्व्यवहाराप्रकरणी कायरकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांची चौकशी करण्यासंदर्भात त्यांची मूळ आस्थापना असलेल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या महासंचालकांना कळविण्यात आले आहे. कायरकर हे महाराष्ट्र सदनला प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -