घरमुंबईओला उबर संपाने मुंबईकर ऑफलाइन

ओला उबर संपाने मुंबईकर ऑफलाइन

Subscribe

मुंबई:-मुंबईत ओला, उबर कॅब चालकांनी दुपारपासून बेमुदत संप पुकारल्याने नागरिकांचे हाल झालेत. ओला, उबर कॅब चालकांच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघटनेने हा बेमुदत बंद पुकारला आहे. ओला, उबर कॅब चालकांनी कुर्ल्यामधील कंपन्यांच्या ऑफिस बाहेर आंदोलन केले. उत्पन्न वाढवण्याची मागणी चालकांनी केली. यानंतर चालकांनी अंधेरीतील ओला कंपनीच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. पण ते कार्यालय बंद होते. कंपन्या जोपर्यंत चालकांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार, असे संघटनेचे सचिव सुनील बोरकर यांनी सांगितले. तर या आंदोलनामुळे आज ओला आणि उबेरचे भाव देखील वाढले होते. ज्या मार्गासाठी नेहमी १०० रुपये आकारले जात होते. त्यासाठी आज ३४५ रुपये आकारण्यात आल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली आहे.

मुंबईत पहाटेच्यावेळी कॅब कमी संख्येत असतात. पण त्याचवेळी कंपन्या प्रवाशांकडून तिप्पट भाडे आकारतात. पण त्याचा फायदा चालकांना होत नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेत. तर दुसरीकडे उबर सारख्या कंपनीने भाडेदरात कपात केली आहे. याचा परिणाम आमच्या उत्पन्नावर झाला आहे. आम्ही संबंधित कंपन्यांच्या अधिकार्‍यांकडे मागण्या मांडल्या आहेत. कंपन्यांनी उत्पन्नात वाढ करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्यांना आमच्या मागण्यांची दखल घ्यावीच लागेल, असे आंदोलक चालकांचे म्हणणं आहे. एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १६ रुपये, एसी सेदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटर १८ रुपये तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान १०० ते १५० रुपये भाडेदर निश्चित (fixed fare ) ठेवावे, अशी कॅब चालकांची कंपन्यांकडे मागणी आहे. प्रत्येक कॅब चालकाचा दिवसाला किमान ३००० रुपयांचा व्यवसाय व्हायला हवा आहे, असे एका कॅब चालकाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -