आधी मैत्रिणीवर केला हल्ला, मग स्वतःच्या तोंडात फोडला बॉम्ब!

कोरोनामुळे भेटण्यास नकार देणाऱ्या ५७ वर्षीय मैत्रिणीच्या घरी जाऊन एका ५५ वर्षीय मित्राने तिच्यावर चाकूने हल्ला करून नंतर स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी मालाड पूर्व येथे घडली. या घटनेत दोघेही गंभीर झाले असून वृद्धाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुरार व्हिलेज पोलिसांनी मित्रावर हत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हर्षाबेन सावला (५७) आणि संजय चव्हाण (५५)अशी या दोघांची नावे आहेत. हर्षाबेन ही घटस्फोटित असून मालाड पूर्व कुरार व्हिलेज या ठिकाणी आपल्या ८० वर्षीय आई सोबत राहते, तर संजय चव्हाण हा ठाणे येथे राहण्यास आहे. हर्षाबेन आणि संजय यांच्यात मागील १५ वर्षांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहे. दोघांच्या या संबंधांबाबत हर्षाबेनच्या आईला देखील कल्पना होती. संजय हा नेहमी हर्षाबेनला भेटण्यासाठी कुरार व्हिलेज येथे येत असे. मात्र, कोरोनाचा काळ त्यात लॉकडाऊन असल्यामुळे दोघांच्या भेटीगाठी बंद झालेल्या होत्या.

लॉकडाऊन शिथिल होताच संजय चव्हाण हा मैत्रीण हर्षाबेनला भेटण्यासाठी बोलावू लागला. परंतु ती टाळू लागल्यामुळे रविवारी सकाळीच ६ वाजता संजय हा मैत्रिणीच्या घरी दाखल झाला आणि आज आपण दोघे दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी जाऊ असे त्याने तिला सांगितले. परंतु हर्षाबेनने त्याच्यासोबत जाण्यास नकार देत यापुढे घरी येत जाऊ नकोस, कोरोना सुरू असून माझ्या घरी वृद्ध आई आहे, असे तिने त्याला बजावले.

तिच्या या बोलण्यावरून संजय संतापला आणि त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातून चाकू आणून मैत्रीण हर्षाबेनच्या गळ्यावर, मानेवर, चेहऱ्यावर सपासप वार केले. हर्षाबेन रक्ताच्या थारोळ्यात पडताच घाबरलेल्या मित्र संजय याने खिशातून सुतळी बॉम्ब काढला आणि स्वतःच्या तोंडात ठेवून तो पेटवला. बॉम्बचा धमाका होताचा शेजारी पाजारी धावत हर्षबेनच्या घरी आले आणि तेथील दृश्य बघून त्यांनी पोलिसांना कळवले.

कुरार व्हिलेज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना कूपर रुग्णलयात उपचारांसाठी दाखल केले. संजय चव्हाण यांचा पूर्ण चेहरा भाजला असून तोंडातील अवयव पूर्णपणे निकामी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुरार व्हिलेज पोलीस ठाण्यात संजय चव्हाण याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब साळुंखे यांनी दिली.

हर्षाबेन हिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून संजय चव्हाण यांची प्रकृती मात्र चिंताजनक आहे. संजय चव्हाण याच्या कुटुंबाबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नसून घरच्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वपोनि. साळुंखे यांनी सांगितले.