घरमुंबईबाप्पा, तूच पालिकेला सुबुद्धी दे ...

बाप्पा, तूच पालिकेला सुबुद्धी दे …

Subscribe

चार महिन्यांपासून वेतन नाही, कंत्राटी सफाई कामगार रजेवर

केडीएमसीतील कंत्राटी सफाई कामगारांना तब्बल चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने शुक्रवारी तब्बल 400 कामगार सामुहिक रजेवर गेले. त्यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली. ऐन सणासुदीत कल्याण डोंबिवलीतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सव तोंडावर असताना आणि अनेक कामगारांच्या घरी गणपती असल्याने त्यांची खरेदी रखडली आहे. बाप्पा तूच यांना सुबुद्धी दे….अशीच प्रार्थना कामगार करीत आहेत.

पालिकेने स्वच्छतेचे खासगी कंत्राट विशाल एक्सपर्ट सर्व्हीसेस कंपनीला दिले आहे. कंपनीचे 120 वाहन चालक आणि 280 कामगार काम करीत आहेत. मात्र कामगारांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. गणेशोत्सव जवळ आल्याने वेतन मिळावे, अशी मागणी कामगारांकडून पालिकेकडे सातत्याने करण्यात येत होती. मात्र कामगारांच्या मागणीकडे सत्ताधारी व प्रशासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आल्याने कामगारांनी सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

तसेच गणेशोत्सव तोंडावर आल्याने अनेकांची खरेदी रखडली आहे. मात्र त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सत्ताधारी कोणाचेही लक्ष नसल्याने त्यामुळे कामगार रडकुंडीला आले आहेत. त्यामुळे गुरुवारी त्यांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना सामुहिक रजेवर जाण्याचे निवेदन सादर केले. चार महिन्यांचे वेतन मिळाल्यानंतर पुन्हा कामावर हजर होऊ, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारपासून कंत्राटी कामगार सामुहिक रजेवर गेल्यानंतर पालिका प्रशासनाची धावपळ उडाली हेाती. शहरात कचर्‍याचे ढीग पसरले होते. त्यामुळे पालिकेतील ठोक पगारावरील कर्मचार्‍यांना साफ सफाईच्या कामासाठी जुंपण्यात आले होते. शनिवारी दहिहंडी सण असल्याने शहरात स्वच्छतेचे बारा वाजल्याने प्रशासनाकडून कामगारांचे वेतन देण्यासाठी धावपळ उडाली होती.

पालिकेतील आर्थिक अडचणीमुळे कंत्राटी कामगारांचे वेतन झालेले नाही. मात्र पालिका प्रशासनाकडून हालचाल सुरू असून, शनिवारपर्यंत त्यांचे वेतन करण्यात येईल. त्यामुळे शनिवारपासूनच कामगार कामावर येतील. सणासुदीच्या काळात अस्वच्छतेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही, यासाठी प्रशासन गंभीर आहे.
-विलास जोशी, उपायुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी

- Advertisement -

सत्ताधारी व प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे. कामगारांना चार -चार महिने वेतन मिळत नाही. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी सरसावताना दिसतात. गणपती सणातही वेतन मिळत नसल्याने हे कामगार सामुहिक रजेवर गेलेले आहेत. कंत्राटदाराला एका कामगाराचे 18 हजार रुपये दिले जातात. मात्र प्रत्यक्षात कामगारांना 10 हजार रुपये वेतन मिळते. कामगारांना किमान वेतनही दिले जात नाही. या सगळ्याला सत्ताधारी व प्रशासन जबाबदार आहे.
-मंदार हळबे नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -