घरमुंबईप्रखर विरोधानंतर पुन्हा एकदा कत्तलखान्याचा मार्ग मोकळा

प्रखर विरोधानंतर पुन्हा एकदा कत्तलखान्याचा मार्ग मोकळा

Subscribe

दररोज निर्माण होणार्‍या घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी जशी क्षेपणभूमीची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शहराला कत्तलखाना आवश्यक आहे. पालिका गेली २० वर्षे त्यासाठी प्रयत्न करीत आहे. अखेर सिडकोला विस्तीर्ण असा भूखंड दिला आहे. त्यामुळे एक अद्ययावत कत्तलखाना पालिकेच्यावतीने बांधला जाणार आहे. दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, नवी मुंबई.

जैन समाजाचा आणि राष्ट्रवादीचा प्रखर विरोध पाहता गेल्या २० वर्षांपासून रखडलेला कत्तलखान्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. त्यासाठी पहिले पाऊल मनपाने पुढे टाकले आहे. तर राष्ट्रवादीचीही भूमिका मवाळ झाली आहे.सदर भूखंड जरी कत्तलखान्यासाठी राखीव असला तरी तो प्रथम ताब्यात घेण्याला आम्ही प्राधान्य दिले असून नंतर त्यावर काय करायचे हे ठरवू, असे राष्ट्रवादीचे महापौर जयवंत सुतार यांनी स्पष्ट केले आहे. त्यावर जैन समाजाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र लवकरच शहरात कत्तलखाना अस्तित्वात येईल याचे संकेत मिळू लागले आहेत.

शहराच्या मध्यभागी कत्तलखान्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडाला विविध धार्मिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे गेली २० वर्षे कत्तलखान्याचा प्रश्न रखडला होता. सिडकोने शिरवणे एमआयडीसी भागात असलेला २१ एकरचा विस्तीर्ण भूखंड पालिकेला दिला असून या भूखंडाचा सात कोटी ७८ लाखांचा पहिला हप्ता भरण्यात आला आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे उघड्यावर होणारी प्राण्यांची कत्तल बंद होऊन एक अद्ययावत व आधुनिक कत्तलखाना उभा राहणार आहे. शहरातील नागरिकांना ताजे, सकस, आणि योग्य मांस उपलब्ध व्हावे यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ६३(१२) अन्वये प्रत्येक महापालिकांना कत्तलखाना उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार नवी मुंबई पालिका गेली २० वर्षे प्रयत्न करीत आहे.

- Advertisement -

पालिकेच्या सर्व सामाजिक सेवा व सुविधा सिडकोने उपलब्ध करुन दिलेल्या भूखंडांवर अवलंबून आहेत. त्यानुसार सिडकोने जुईनगर सेक्टर -२५ येथे एक भूखंड जाहीर केला होता. पालिकेने त्या ठिकाणी कत्तलखाना उभारण्याचा आराखडादेखील तयार केला. पण त्याला स्थानिक धार्मिक आणि जातीय संस्थांनी विरोध केला.

या संस्थांच्या व्होट बँकेवर डोळा ठेवून राजकारणाची पोळी भाजणार्‍या येथील राजकीय नेत्यांनीही या अत्यावश्यक गरजेच्या विरोधात आपला आवाज मिसळला. त्यामुळे काही मूठभर लोकांचा विरोध आणि त्याला मिळालेला राजकीय पांठिबा यामुळे पालिकेला जुईनगरमधील जागेवर पाणी सोडावे लागले. कत्तलखाना लोकवस्तीपासून दूर असावा अशी एक मागणी पुढे आली होती. त्यानुसार पालिकेने सिडकोच्या अडगळीत पडलेल्या भूखंडाचा शोध घेतल्यानंतर शिरवणे एमआयडीसीतील भूखंड क्रमांक ३२३ बी (पीटी) हा २१ एकरचा भूखंड निश्चित करण्यात आला.

- Advertisement -

ही जागा शहराच्या बाहेर एमआयडीसीच्या क्षेत्रात आहे. शिरवणे येथील नवीन वाहन विक्री करणार्‍या ऑटोमोबाइल कंपन्यांच्या मागे हा भूखंड असून लोकवस्तीपासून दूर आहे. पारसिक डोंगराचा एक भाग असलेल्या शिरवणे टेकडीच्या पायथ्याशी सिडकोचा हा भूखंड गेली कित्येक वर्षे विक्रीविना पडून आहे. सिडको तो कत्तलखान्यासाठी पालिकेला देण्यास राजी झाली असून त्याचा पहिला हप्ता १० ऑक्टोबर रोजी पालिकेने भरलेला आहे. एकूण १८ कोटी रुपयांचा (सेवा सवलतीच्या दरात) हा भूखंडासाठी पाहिला हप्ता ७ कोटी ७८ लाख असून पुढील महिन्यात दुसरा हप्ता भरला जाणार आहे. तीन ते चार महिन्यात ही सर्व रक्कम अदा केल्यानंतर भूखंडासाठी सिडकोबरोबर पालिका करारनामा करणार आहे.

जैन मुनी विराग सागरजी महाराज यांनी गतवर्षी वाशीत सभा घेऊन कत्तलखान्याला प्रखर विरोध दर्शविला. त्यावेळी जैन संघटनांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन नवी मुंबईत कत्तलखाना होऊ देणार नसल्याचे आश्वासन घेतले. त्यामुळे गणेश नाईक यांनीही या कत्तलखान्याला प्रखर विरोध दर्शवला असता तो प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडला आहे. पुन्हा आता गणेश नाईक यांची सत्ता असलेल्या मनपात सदरील विषय समोर आला असून मनपानेच यासाठी पुढाकार घेतला आहे.

कत्तलखान्याला जरी विरोध होत असला तरी आता तो होण्यासाठी काळाची गरज आहे.रस्त्यावर अथवा पदपथावर सर्रास चिकन -मटन विक्रेते कत्तल करत असल्याने वातावरण प्रदूषित होते. त्यामुळे कत्तलखान्याची गरज आहे.सदरील भूखंड हा कत्तलखान्यायासाठी आरक्षित असल्याने तो सर्वप्रथम आपल्या ताब्यात घेणे ही आमची भूमिका आहे.त्यानंतर यावर विचार केला जाईल.

जयवंत सुतार :- महापौर,नवी मुंबई महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -