पुन्हा एकदा आरेतील झाडांची होणार पाहणी

मेट्रो कार डेपोमधील झाडे कापण्याच्या प्रस्तावाला काँग्रेससह शिवसेनेने विरोध दर्शवला आहे. 

Mumbai
bmc
मुंबई महापालिका

मेट्रो प्रकल्पाच्या कार डेपोच्या बांधकामात अडथळा ठरणारी आरे कॉलनीतील झाडे कापण्याचा प्रस्तावाला शिवसेनेसह काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध करत पुन्हा एकदा पाहणी करण्याची मागणी केली. ”ही झाडे कापण्यात येणार असल्याने आरेतील २७ आदिवासी पाडे उध्वस्त होणार आहेत. त्यामुळे जोपर्यंत त्यांच्या उदरनिर्वाहाचे धोरण अवलंबले जात नाही तसेच विविध संस्थांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची उत्तरे दिली जात नाही, तोपर्यंत हा प्रस्ताव मंजूर करू नये,” अशी मागणी शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. या मागणीची दखल घेत २० ऑगस्ट रोजी पाहणीची तारीख निश्चित करत अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.

हेही वाचा – ठाण्यात मागील वर्षापेक्षा ५ हजार मिमी जास्त पावसाची नोंद

प्रस्तावावर काँग्रेस, राष्ट्रवादीने घेतली हरकत

अंधेरी पूर्व येथील आरे वसाहत येथील मेट्रो रेल्वे ३ प्रकल्पांतर्गत मेट्रो कार डेपोच्या प्रस्तावित बांधकामात अडथळा करणारी २ हजार २३८ झाडे कापण्यास आणि ४६४ झाडे पुनर्रोपित करण्यास तसेच ९८९ झाडे आहेत तशीच ठेवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने २१ जुलै २०१७ रोजी प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाला सादर केला होता. हा प्रस्ताव मंगळवारी वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीपुढे मंजुरीला आला असता, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, काँग्रेसचे जगदीश अमित कुट्टी आणि राष्ट्वादी काँग्रेसचे कप्तान मलिक यांनी तीव्र हरकत घेतली. यानंतर सर्वच सदस्यांनी पुन्हा पाहणीची मागणी करताना खाजगी स्वयंसेवी संस्था आणि पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयांची उत्तरे तसेच त्यांच्या शंकांचे निकारण करण्यात आले आहे का? अशी विचारणा केली. तसेच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत निर्णय घेणे योग्य आहे का? याबाबतची विचारणा प्रशासनाकडे केली. परंतु प्रशासनाच्या उत्तराने सदस्यांचे समाधान न झाल्याने पाहणीची मागणी प्राधिकरणाचे अध्यक्षपद भुषवणार्‍या विजय सिंघल यांनी मान्य केली. त्यामुळे २० ऑगस्ट रोजी सर्व सदस्यांसह कारशेडमधील बाधित झाडांची पाहणी केली जाईल, असे सांगत हा प्रस्ताव राखून ठेवला. तर भाजपचे अभिजित सामंत यांनी हा प्रस्ताव मंजूर करणे कसे आवश्यक आहे, ही बाब पटवून देण्याचा प्रयत्न केला.

ज्या ठिकाणी कारशेड बनवले जाणार आहे, त्यामुळे २७ आदिवासी उध्वस्त होणार आहे. त्यांचे पुनर्वसन कुठे केले जाणार आहे. तसेच यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचे साधनही हिरावून घेतले जाणार आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाबाबत काय निर्णय घेतला आहे? तसेच ज्या ८० हजार हरकती व सूचना केल्या आहेत, त्यांचे निराकरण झाले आहेत का? किंवा त्यांचे यामुळे समाधान झाले का? हे स्पष्ट करावे. मेट्रो रेल्वे सर्वांनाच हवी आहे. परंतु त्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल शिवसेना होऊ देणार नाही. त्यामुळे वृक्षतोडीला शिवसेनेचा विरोध राहिल. कारशेड केवळ हट्टापायीच आरेमध्ये होत असेल तर ते योग्य नाही. कारशेडसाठी अन्य जागा निवडायला हवी, असेही त्यांनी सांगितले. कारशेडबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ नये तसेच आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा निर्णयही प्रशासनाने करावा, याच मागणीसाठी हा प्रस्ताव प्रशासनाला राखून ठेवण्यास भाग पाडले.
यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष, मुंबई महापालिका

विकासाच्या नावावर झाडांची बेसुमार कत्तल करू नये. सध्या वातावरणातील बदलामुळे जे पर्यावरणीय दूष्परिणाम दिसून येत आहे, ते पाहता या प्रस्तावाला काँग्रेस पक्षाचा विरोधच आहे. तसेच जी झाडे पुनर्रोपित करतो म्हणून जी झाडे दाखवली जातात ती पुनर्रोपित होतच नाहीत. केवळ झाडांची फांदी उभी करून पुनर्रोपित केल्याचे दाखवले जाते.
रवी राजा, विरोधी पक्षनेते, मुंबई महापालिका