घरमुंबईएक लाख प्रवाशांकडून रेल्वे नियम धाब्यावर

एक लाख प्रवाशांकडून रेल्वे नियम धाब्यावर

Subscribe

रेल्वेच्या कायद्यातील विविध कलमांचा भंग करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्या रोखण्यासाठी आरपीएफकडून विविध कलमांखाली कारवाई केली जाते. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे. २०१८ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाकडून पश्चिम रेल्वेवर नियम मोडणार्‍यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात नियम मोडणार्‍या प्रवाशांची संख्या १ लाख ४ हजार ३८ इतकी आहे. या सर्वांवर रेल्वे अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई २०१७ च्या तुलनेत यावर्षी जवळपास ४ हजारच्या संख्येने जास्त आहेत.

रेल्वेच्या कायद्यातील विविध कलमांचा भंग करणार्‍या प्रवाशांविरोधात, तसेच फेरीवाल्यांविरोधात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. २०१८ मध्ये एक लाख ४ हजार ३८ इतके रेल्वे कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत. या सर्वांवर रेल्वे अधिनियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत २०१७ च्या तुलनेत यावर्षी ४ हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. आरपीएफकडून रेल्वे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाते. त्यासाठी मोहीम राबविली जाते, मात्र तरीही नियमभंग करणार्‍यांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. पश्चिम रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध व्हावा, यासाठी पावले उचलली जातात. मात्र त्याचा पुरेसा परिणाम होत नाही.

- Advertisement -

उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये किंवा रेल्वे स्थानक, पादचारी पुलांवर ठाण मांडणार्‍या फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. अनेकदा या फेरीवाल्यांकडून प्रवाशांना धमकावण्याच्याही घटना घडतात. त्यांना आवर घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात २०१८ मध्ये एकूण १२ हजार ४५४ जणांवर गुन्हे नोंदविले आहेत. तर आरक्षित डब्यात घुसखोरी करणार्‍या प्रवाशांच्या विरोधात ३२ हजार २९० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर रेल्वे रूळ ओलांडणार्‍यांविरोधात १० हजार ८४७ प्रवाशांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यातील सर्वाधिक गुन्ह्याची संख्या ही महिलांच्या डब्यातील घुसखोरीची आहे. वर्ष २०१७ मध्ये महिलांच्या आरक्षित डब्यात घुसखोरी केल्या प्रकरणी १० हजार ८४९ इतके गुन्हे नोंद झाले होते. ही संख्या आता वाढून ११ हजार ९८७ वर जाऊन पोहचली आहे.

अस्वच्छता पसरविणार्‍यांची संख्या घटली
स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेकडून स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती. त्याचा परिणाम २०१८ मध्ये दिसून आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात अस्वच्छता पसरवल्याची प्रकरणे वर्ष २०१७ मध्ये ५ हजार २४३ होती. ती २०१८ मध्ये ४ हजार ४९४ अशी कमी झाली आहेत.

- Advertisement -

तर रेल्वेच्या डब्यात किंवा रेल्वे स्थानकावर धूम्रपान करणार्‍यांची संख्याही २०१७ मध्ये २ हजार ५५१ इतकी होती. ती २०१८ मध्ये १ हजार ९०९ अशी कमी झाली आहे.

चेनपुलिंगच्या घटना वाढल्या  
धावत्या रेल्वेची चेन खेचून गाड्या थांबविण्याच्या घटनांमध्ये २०१८ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. २०१७ मध्ये चेनपुलिंगच्या ९४३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. मात्र २०१८ मध्येही ही संख्या १ हजार १४२ वर जाऊन पोहचली आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -