बोगस डॉक्टरांसोबत बोगस लॅबचा धंदा तेजीत

आठ हजार अवैध लॅबमधून रोज लाखभर रुग्णांची पिळवणूक

Mumbai
Pathologist's ultimatum to government against bogus labs
पॅथॉलॉजिस्ट

राज्यात बोगस डॉक्टरांसोबत बोगस लॅबचाही व्यवसाय तेजीत सुरू असल्याचं वारंवार समोर आलं आहे. राज्यात आठ हजार अवैध लॅबमधून रोज एक लाख रुग्णांची पिळवणूक होत असल्याचं पॅथॉलॉजिस्ट संघटनांकडून सांगण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. अनेकदा कारवाई करुनही बोगस डॉक्टरांचा बोगस लॅबमध्ये वाढलेला सुळसुळाट थांबताना दिसत नाही. तरीही राज्य सरकारकडून अवैध लॅबधारकांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे.

आरोग्य तपासणी अहवाल फक्त पॅथॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तसेच नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रतिस्वाक्षरीत करावेत असे नमूद केले आहे. पण, पॅथॉलॉजिस्ट शिवाय तंत्रज्ञांनी स्वतंत्रपणे चालवलेल्या लॅबोरेटरी जनतेच्या जीवाशी खेळ करत आहेत. यातून रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याचे राज्य मानवी हक्क आयोगाकडूनही २०१८ मध्ये नमूद करण्यात आले होते. त्याचवेळी शासन निर्णयाचे परिपत्रक अंमलात आणावे अशी शिफारस आय्योगाकडून सरकारला करण्यात आली होती.

बोगस लॅबधारकांची ही स्थिती सुरू असताना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने बोगस डॉक्टरांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार, ६० हजार बोगस डॉक्टर आहेत. पण, या बोगस डॉक्टरांसोबत बोगस लॅबची भर असल्याने राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे. मुंबई, ठाणेसारखी शहरे कोट्यवधी लोकसंख्येचा आकडा पार करुन पुढे चालली आहेत. अशात संसर्गजन्य आजार पसरले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचे अचूक निदान करणारे पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध असतात. तरीही बोगस लॅब चालवणाऱ्यांचा धंदाही जोरात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, २०१९ च्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातील सदस्यांनी ’बेकायदा लॅबोरटरी‘ या विषयावर लक्षवेधी मांडली होती. यावेळी चर्चेदरम्यान सरकारकडून एका महिन्याच्या आत २०१६ चा आदेश रद्द करून नवीन आदेश काढण्याचा निर्णय घेण्यात येईल. असं सांगण्यात आलं होतं. पण, या आश्वासनाला सहा महिने लोटले तरीही अजून आदेश काढण्यात आलेले नाही. त्यामुळे सरकारकडून अवैध लॅबचालकांना पाठीशी घालण्याचा आरोप संघटनांकडून होत आहे.

मागील पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने मान्य केलेला आदेश संवेदनशीलता दाखवून पूर्तता करण्याची गरज आहे. सहा माहिने लोटून गेले आहेत. आता नवीन सरकारकडून अपेक्षा असून जनतेला न्याय द्यावा.

डाॅ. संदीप यादव, अध्यक्ष, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाजिस्ट अँड मायक्रोबायोलाॅजिस्ट