समलिंगी संबंधात वाद; पहिल्याने काढला तिसऱ्याचा काटा

मोहम्मद माझ्यासोबत संबंध न ठेवता पार्थला कसा भेटतो? याचा राग त्याला आला आणि मग...

Mumbai
boy killed his mothers
प्रातिनिधिक छायाचित्र

समलिंगी संबंधातून झालेल्या वादातून पार्थ मणिकांत रावल नावाच्या एका २५ वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना वांद्रे परिसरात घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी या आरोपाखाली गुन्हा नोंदवून आरोपी धवल प्रफुलभाई उनाडकर याला अटक केली आहे. रविवारी सकाळी वांद्रे परिसरात घडलेल्या या प्रकाराने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.

या कारणामुळे झाला खून

मोहम्मद आसिफ हा तरुण वांद्रे येथील हिल रोडवरील वेटो निका स्ट्रिट, यास्मिन व्हिला परिसरात राहतो. धवल उनाडकर हा त्याचा मित्र असून तो बोरिवलीतील साईबाबा नगरात राहतो. धवल हा गे असून त्याने मोहम्मद आसिफसोबत समलिंगी संबंध ठेवण्याची विनंती केली होती. मात्र मोहम्मदने या संबंधास नकार देत उलट धवललाच एचआयव्ही टेस्ट करण्याचा सल्ला दिला. रविवारी सकाळी मोहम्मद आसिफचा मित्र पार्थ हा दुबईहून त्याला भेटायला आला होता. यावेळी मोहम्मदच्या घरात ते दोघेही एकत्र होते. याच दरम्यान धवल तिथे पोहोचला. या दोघांना घरात एकातांत पाहिल्यानंतर त्याने मोहम्मद आसिफशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरु असतानाच त्याने पार्थच्या डोक्यात लाकडी स्टॅण्डने हल्ला केला. तसेच लॅपटॉपच्या वायरने त्याचा गळा आवळण्याचा देखील प्रयत्न केला. त्यात पार्थ गंभीररीत्या जखमी झाला. रक्तबंबाळ अवस्थेत या दोघांनी त्याला लिलावती रुग्णालयात दाखल केले.

पार्थ हा अपघातात जखमी झाल्याचे सांगून दोघांनीही डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल न करता प्राथमिक औषधोपचार करुन घरी आणले. मात्र घरी आणल्यानंतर पार्थची प्रकृती प्रचंड ढासळली. त्यामुळे त्याला या दोघांनी पुन्हा भाभा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही माहिती रुग्णालयातून समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी मोहम्मद आसिफचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. यावेळी पार्थची हत्या धवल उनाडकर यानेच केली असल्याचे त्याने सांगितले. तसेच धवलला विरोध केला असता मला जिवे मारण्याची धमकी देऊन माझा गळा आवळून हत्येचा प्रयत्न केला असल्याचे मोहम्मदने पोलिसांना सांगितले.

यानंतर पोलिसांनी धवलविरुद्ध हत्येसह, हत्येचा प्रयत्न, जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच रविवारी रात्री उशीरा आरोपी धवल उनाडकर याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला सोमवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here