घरताज्या घडामोडीकपड्यांच्या खरेदीवर एक किलो कांदा फ्री; दुकानदाराची धम्माल शक्कल!

कपड्यांच्या खरेदीवर एक किलो कांदा फ्री; दुकानदाराची धम्माल शक्कल!

Subscribe

बाजारात कांद्याचे भाव शंभरी पार होत असताना ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी उल्हासनगरमधल्या एका कापड विक्रेत्याने १ हजार रुपयांच्या खरेदीवर १ किलो कांदे मोफत अशी भन्नाट ऑफर दिली आहे!

दिवसेंदिवस कांद्याचे दर वाढतच चालले असून कांदा ही एक महागडी वस्तू झालेली आहे. मात्र, कांद्याच्या नावाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका कापड दुकानदाराने अनोखी शक्कल लढवली आहे. १ हजार रुपयांच्या कपड्यांच्या खरेदीवर १ किलो कांदा फ्री अशी ऑफर या दुकानदाराने काढली आहे. उल्हासनगरच्या शितल हँडलूमचे मालक ललित शेवकानी यांनी ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात कांद्याचा वाढलेला भाव हा चर्चेचा विषय झाला आहे. कांद्याने शंभरी ओलांडल्यामुळे महिला वर्ग संतप्त झाला आहे. त्यामुळे कापड खरेदीवर कांदा मोफत देऊन काहीसा दिलासा उल्हासनगर मधील महिलांना मिळत आहे.

हजार रुपयांची खरेदी आणि १ किलो कांदे!

उल्हासनगर – २ येथील शिरू चौका जवळ असलेल्या शितल हँडलूम या दुकानात ब्लँकेट, चादर, उशीचे कव्हर, पडदे, पाय पुसणी आदी गोष्टी मिळतात. या दुकानात महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्यांच्यात कांद्याचे भाव वाढल्याचीच चर्चा असते. या चर्चांना शितल हँडलूमचे मालक ललित शेकवानी यांनी मूर्त रूप देत एक हजार रुपयांच्या खरेदीवर एक किलो कांदे मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी तब्बल ४० किलो कांदे संपले, अशी माहिती ललित यांनी दिली आहे.

- Advertisement -

लग्न काही दिवसांवर आलेल्या आरती चांदवानी आणि त्यांची मैत्रीण मेहक किंमतानी यांनी शुक्रवारी सायंकाळी शितल हँडलूम मधून दहा हजार रुपये किंमतीची खरेदी केली. आरती शितल हँडलूम दुकानात नेहमी खरेदी करण्यासाठी येतात. या खरेदीनंतर त्यांना ललित यांनी कांद्याचे पाकीट दिल्यामुळे सुखद धक्का बसल्याचे आरती यांनी सांगितले.


हेही वाचा – चोराने ७ क्विंटल कांदे चोरले; शेतकऱ्याची पोलीस स्टेशनला धाव!

१०० रुपये किलोचा दर्जेदार कांदा!

या योजनेबाबत ललित यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘आम्ही दुकानाबाहेर कुठेच जाहिरात फलक लावलेला नाही. काही ग्राहकांनी दुकानात येऊन ६०० ते ७०० रुपयांची खरेदी केल्यावर त्यांना एक हजार पर्यंत खरेदी करण्यासाठी विनंती करतो आणि एक किलो कांदा मोफत देतो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आश्चर्य पाहण्यासारखे असते. जो कांदा आम्ही देत आहोत तो शंभर रुपये किलोने विकत घेतला आहे. उच्च दर्जाचा आहे. जोपर्यंत कांद्याचे भाव पुन्हा पूर्वीप्रमाणे होत नाहीत, तो पर्यंत आम्ही महिला ग्राहकांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी ही योजना चालू ठेवणार आहोत’, असं देखील दुकानदार ललित यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -