घरताज्या घडामोडीठगांचे कर्दनकाळ नितीन नांदगावकरांच्या नावानेच महाठगाने वळविले लाखो रूपये!

ठगांचे कर्दनकाळ नितीन नांदगावकरांच्या नावानेच महाठगाने वळविले लाखो रूपये!

Subscribe

शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्या नावाने मदतीचे आश्वासन देऊन एका व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच दोन भामट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रोहित हंबीराव कांबळे आणि सुरज शरद निकम अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमके काय घडले? 

यातील तक्रारदार संदीप राजकुमार राजपूत हे अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, पीक व्हिलामध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. गेल्या वर्षी जून महिन्यांत त्यांनी नालासोपारा येथे एक फ्लॅट बुक केला होता, याच फ्लॅटसाठी त्यांनी विकी सिद्धीकी या व्यक्तीला सुमारे अठरा लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत विकीने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही तसेच फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत केले नाही. २२ जून २०२० रोजी त्यांनी शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्या फेसबुकच्या फॅन क्लबमध्ये ही माहिती पोस्ट करून त्यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. त्यानंतर २३ जुलै २०२० रोजी किरण महाडिक नावाच्या एका व्यक्तीने फोन करून ते नितीन नांदगावकर यांच्या कार्यालयातून बोलत आहे, त्यांचा अर्ज त्यांना प्राप्त झाला असून त्यांचे पैसे वसुलीसाठी आपण प्रयत्न करू, त्यासाठी त्यांच्याकडून कुठलीही फी आकारली जाणार नाही. मात्र त्यांना त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागेल असे सांगितले. त्यांनीही त्यास होकार दिला होता. त्यानंतर किरणने त्यांच्याकडे विविध कारण सांगून बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.

- Advertisement -

२३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत संदीप राजपूत यांनी किरणच्या सांगण्यावरून त्यांच्या बँक खात्यात १ लाख ५४ हजार रुपये जमा केले. मात्र ही रक्कम जमा करूनही त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी होऊ लागली. हा प्रकार संशयास्पद वाटताच संदीप राजपूत यांनी नितीन नांदगांवकर यांच्या कार्यालयात जाऊन किरण महाडिक यांच्याविषयी चौकशी केली. यावेळी त्यांना तिथे कोणीही किरण महाडिक नावाचा व्यक्ती काम करीत नसल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ४१९, ४२०, ३४ भादंवी सहकलम ६६ (सी), (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन रोहित आणि सुरज या दोघांना सातारा येथून ताब्यात घेतले. चौकशीत रोहितच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती. त्यासाठी त्याला सुरजने करण्यास प्रवृत्त केले होते. या दोघांनीच संदीप यांना संपर्क साधून त्यांना मदतीचे आश्वासन देऊन त्यांची ऑनलाईन फसवणूक केली होती. त्यामुळे या दोघांनाही नंतर पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशाच आमिष दाखवून डॉक्टरला ५० लाखाचा गंडा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -