परवानग्या मिळवताना गणेश मंडळांच्या नाकी नऊ;ऑनलाईन पर्याय ठरतोय डोकेदुखी

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसा तयारीला जोर चढत आहे. एकीकडे सर्व मंडळांमध्ये पाद्यपूजनाचे दिमाखदार सोहळे पार पडत आहेत, तर दुसरीकडे मंडळांचे कार्यकर्ते येत्या काळात उत्सवाला लागणार्‍या परवानग्यांसाठी झटत आहेत.

Mumbai
online form
ऑनलाईन फॉर्म

गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे, तसतसा तयारीला जोर चढत आहे. एकीकडे सर्व मंडळांमध्ये पाद्यपूजनाचे दिमाखदार सोहळे पार पडत आहेत, तर दुसरीकडे मंडळांचे कार्यकर्ते येत्या काळात उत्सवाला लागणार्‍या परवानग्यांसाठी झटत आहेत. महानगरपालिकेने या वर्षापासून मोठा गाजावाजा करत उशिरा का होईना, पण लवकर परवानगी देण्यासाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिला. मात्र, ही ऑनलाइन सिस्टिम सुरळीत चालत नसल्याची खंत मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली. या करिता येत्या गणेशोत्सवाच्या काळात या परवानग्या कशा मिळवायच्या, असा प्रश्न मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळांना पडला आहे.

मुंबईत ११ हजाराहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गेल्या वर्षापर्यंत मंडळातील कार्यकर्त्यांना मंडप, पोलीस, ट्राफिक यांसारख्या विविध विभागांकडून परवानगी घेण्यासाठी अनेक फेर्‍या माराव्या लागायच्या. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी १५ जुलैपासून या परवानग्या ऑनलाईन देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण प्रत्यक्षात मात्र २० जुलैला म्हणजेच पाच दिवस उशिराने ही सेवा सुरू केली. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरला जात नव्हता. यामध्ये कधी कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड न होणे, जर अपलोड झाली तर फॉर्म सबमिट होत नाही, मध्येच वेबसाईटला बफरिंगला खूप वेळ लागतो. त्यामुळे गणेशोत्सवासाठी परवानगी कशी मिळवावी असा प्रश्न मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना पडला आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असताना “या संदर्भात उद्या सविस्तर माहिती दिली जाईल” असे सांगण्यात आले.

महानगरपालिकेने सुरुवातीला ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा अर्ज भरला जात नाही. ऑनलाईन अर्ज भरण्याचा तर प्रयत्न करूच. मात्र, यासोबतच जुन्या पद्धतीप्रमाणेच लेखी पत्रव्यवहाराद्वारेच गणेशोत्सवासाठी परवानगी मागण्याच्या तयारीला सुरूवातदेखील करत आहोत.
-दिलीप पाटील, सरचिटणीस, उमरखाडीचा राजा

ही ऑनलाईन प्रक्रिया सुरू तर केली. मात्र, अर्ज भरताना अनेक अडचणींना समोरे जावे लागते आणि शेवटी अर्ज भरलेच जात नाही. आम्ही येत्या काळात लेखी अर्ज देऊनही परवानगी मिळवू, मात्र यामध्ये कार्यकर्त्यांचा खूप वेळ वाया जाणार आहे.
-दत्ता दळवी, अध्यक्ष, ग्रॅन्टरोडचा राजा

 

खेतवाडीतील गणेशोत्सव मंडळे ‘कृष्णकुंज’व
खेतवाडी येथील गणेशोत्सव मंडळांना भेडसावणार्‍या प्रश्नांसंदर्भात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. दरम्यान उद्या राज ठाकरे स्वतः खेतवाडी भागात पाहणी करायला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.