घरमुंबईऑनलाईन शॉपिंग; ३६० रूपयांचा टी-शर्ट पडला लाखात

ऑनलाईन शॉपिंग; ३६० रूपयांचा टी-शर्ट पडला लाखात

Subscribe

दिवाळीची शॉपिंग पडली महागात; ऑनलाइन रिफंडमध्ये लाखभराचा भुर्दंड

हल्ली ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. बसल्याजागी आपल्याला हवी ती वस्तू घेता येत असल्यामुळे अनेकजण ऑनलाईन शॉपिंगचा मार्ग पत्करतात. मात्र ऑनलाईन खरेदी किती सुरक्षित आहे? यावर मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. असाच एक वाईट अनुभव दहिसर येथील वाघेला कुटुंबाला आला आहे. दिवाळी खरेदी निमित्त दहिसर येथील एका मुलाने क्लब फॅक्टरी अॅपवरून ३६० रूपयांचा टी-शर्ट ऑनलाइन मागवला. मात्र टी-शर्ट न झाल्याकारणाने त्याने अॅपवर रिफंडसाठी तक्रार नोंदवली. पण पैसे रिफंड करायच्या नावाखाली त्याच्या खात्यामधून एक लाख रूपये गायब झाल्यामुळे, त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. या संदर्भात त्यांनी दहिसर पोलिस स्थानकात अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली आहे.

दहिसर पूर्वेला आपल्या कुटुंबियांसोबत राहणाऱ्या ३५ वर्षीय सीमा वाघेला यांच्या मुलाने १० ऑक्टोबर रोजी क्लब फॅक्टरी अॅपवरून ३६० रूपयांचे टी-शर्ट ऑर्डर केले. ७ दिवसांनी डिलिव्हरी आल्यानंतर त्यांनी पेसै दिले आणि टी-शर्ट घालून पाहिले. मात्र, टी-शर्ट व्यवस्थित न बसल्यामुळे त्याने अॅपवरून ते बदली करण्याची माहिती मिळवली आणि तेथून मिळालेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी क्लब फॅक्टरी मधून बोलत असल्याचे सांगून त्यांनी रिफंडसाठी १५ दिवस लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती घेण्यास ते परत संपर्क साधतील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील, असेही सांगितले. आपले पैसे परत मिळतील या आशेने वाघेला याने विश्वास ठेवला.

- Advertisement -

त्यानंतर त्याच दिवशी दुपारी त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला. तेव्हा त्यांनी आपल्या डेबिट कार्डची सर्व माहिती समोरील व्यक्तीला दिली. येत्या २४ तासांत त्यांना पैसे परत मिळतील असे अॅपवरून बोलत असलेल्या व्यक्तीने सांगितले. मात्र काही वेळानंतर वाघेला यांच्या मोबाइलवर आलेल्या संदेशामुळे संपुर्ण कुटुंबियांना मोठा धक्काच बसला. सुरूवातीला ४० हजार, नंतर २५ हजार, मग २० हजार, असे करत करत एकूण एक लाख रूपये त्यांच्या खात्यातून गायब झाले. अवघ्या १९ मिनिटांत एवढी मोठी रक्कम काढण्यात आली. रिफंड तर लांबचीच गोष्ट, पण ऐन दिवाळीत एवढा मोठा भुर्दंड बसल्यामुळे सीमा आणि त्यांच्या कुटुंबाचा गोंधळच उडाला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि एवढे मोठे नुकसान पत्करावे लागले.

दहिसर पोलिस ठाण्यात त्यांनी याबाबतीत तक्रार नोंदवली असली तरी अद्याप आरोपीचा शोध पोलिसांना लागलेला नाही. दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक वसंत पिंगळे यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा कसून तपास करीत आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -