घरCORONA UPDATEकोरोना योद्ध्यांना ऑनलाईन प्रशिक्षण; जम्बो सुविधा केंद्राला देण्यासाठी प्रशासनाची तयारी

कोरोना योद्ध्यांना ऑनलाईन प्रशिक्षण; जम्बो सुविधा केंद्राला देण्यासाठी प्रशासनाची तयारी

Subscribe

मुंबईमध्ये वरळी नेहरू तारांगण, रेस कोर्स, बीकेसी-एमएमआरडीए, नेस्को आणि सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या जम्बो सुविधा केंद्रांवर नियुक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्यात वाढत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता कोरोना योद्ध्याना ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मुंबईमध्ये वरळी नेहरू तारांगण, रेस कोर्स, बीकेसी-एमएमआरडीए, नेस्को आणि सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या जम्बो सुविधा केंद्रांवर नियुक्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मुंबईमध्ये काही दिवसांपासून सलग हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याने महापालिकेसह राज्य सरकारसाठी चिंतेची बाब ठरत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आवश्यक खाटा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून महापालिकेच्या सहकार्याने मुंबईतील वरळी नेहरू तारांगण, रेस कोर्स, बीकेसी-एमएमआरडीए, नेस्को आणि सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये जम्बो सुविधा केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या प्रत्येक जम्बो केंद्रांवर ५० निवासी डॉक्टर, खासगी रुग्णालयामध्ये १०० भुलतज्ज्ञ, श्वसनविकार तज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, तसेच मेडिसिन आणि सर्जरी विभागातील डॉक्टर उपलब्ध करण्यात येणार आहेत. साथरोग नियंत्रण कायद्यांतर्गत या डॉक्टरांना नियुक्त करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुंबईमधील वैद्यकीय कॉलेजच्या अधिष्ठातांचे सहकार्याने ही नियुक्ती करण्याची जबाबदारी राज्य सरकारने डॉक्टर तात्याराव लहाने आणि पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. तसेच परिचारिका आणि नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी आणि अन्य कर्मचारी यांना या जम्बो सुविधा असलेल्या केंद्रांवर ड्युटी लावण्यात येणार आहे. जम्बो सुविधा केंद्रांवर नियुक्त करण्यात येणारे कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका यांना राज्य सरकारतर्फे कोविडचा सामना करण्यासाठी तातडीने ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी पालिकेच्या सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जम्बो सुविधा केंद्र असलेल्या वरळी नेहरू तारांगण, रेस कोर्स, बीकेसी-एमएमआरडीए, नेस्को आणि सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. ही सुविधा दोन आठवड्यांमध्ये जम्बो सुविधा केंद्रांवर उपलब्ध करण्यात येणार आहे.

जम्बो सुविधा केंद्रावरील सुविधा

केंद्र ऑक्सिजन बेड आयसीयू बेड
बीकेसी ८०० १५०
नेहरू तारांगण ६०० ५०
रेसकोर्स ८०० ५०
नेस्को ७५० १००
सेव्हन हिल – १००

- Advertisement -

एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने चालवणार बीकेसीतील केंद्र

राज्य सरकार व पालिकेमार्फत मुंबईत सुरू करण्यात येणाऱ्या चार जम्बो सुविधा केंद्रापैकी बीकेसीतील सुविधा केंद्र चालवण्याची तयारी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. अजित देसाई यांनी दाखवली आहे. यासंदर्भात पुढील दोन दिवसांत निर्णय होणार आहे. त्यामुळे बीकेसीतील केंद्र हे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने चालवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -