Monday, August 10, 2020
Mumbai
28 C
घर महामुंबई राज्याच्या आरोग्य विभागाचेच आरोग्य धोक्यात

राज्याच्या आरोग्य विभागाचेच आरोग्य धोक्यात

पाणी पिण्यायोग्य नसल्याचा प्रयोगशाळेचा अहवाल

Mumbai
आरोग्य विभाग

राज्याच्या आरोग्याबाबत निर्णय घेत असलेल्या आरोग्य विभागाच्या आरोग्याला कुलरचे ग्रहण लागले आहे. आरोग्य विभागातील पाण्याच्या नमुन्यांची नुकत्याच केलेल्या तपासणीत इमारतीमधील कुलर व उपहारगृहातील पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. आरोग्य विभागातील अनेक कर्मचारी काही दिवसांपासून कावीळ व अन्य साथीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत.

सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या परिसरात असलेल्या आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये कर्मचार्‍यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर कुलर बसवला आहे. परंतु शुद्ध पाण्यासाठी बसवलेल्या कुलरमधीलच पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल ठाणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून अधूनमधून येणारे दूषित पाणी, आरोग्य विभागातील कावीळ व साथीच्या आजाराने त्रस्त असलेले कर्मचारी यामुळे आरोग्य विभागाने जुलैमध्ये प्रत्येक मजल्यावरील नळातून येणारे पाणी व कुलरमधून येणार्‍या पाण्याचे नमुने घेतले.

हे नमुने सूक्ष्म जीवीय तपासणीसाठी ठाणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवले. पाण्याच्या नमुन्यांच्या अहवालामध्ये इमारतीमधील कुलर व उपहारगृहातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल ठाणे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेने दिला आहे. एकीकडे कुलरमधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल दिला असताना नळाचे पाणी योग्य असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कुलरमधील पाण्यामध्ये कोलीफॉर्म्सचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. कर्मचार्‍यांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी इमारतीमध्ये बसवलेले कुलर अनेक दिवस स्वच्छ केले जात नाहीत. तसेच त्यांच्या देखरेखीकडेही दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे शुद्ध पाण्याऐवजी त्यातून पिण्यास अयोग्य पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कुलरमधून होत असलेल्या अयोग्य पाण्याच्या पुरवठ्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांवर कुलरऐवजी नळाचे पाणी बरे असे म्हणण्याची वेळ आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या साथरोग विभागाच्या सहाय्यक संचालक सुरेखा चिंचोलीकर-आठवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.

आयुक्तांसाठी स्वतंत्र फिल्टर

एकीकडे आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी बसवण्यात आलेल्या कुलरमधून अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. त्याच्या देखरेखीकडे दुर्लक्ष होत असताना आरोग्य विभागाच्या आयुक्तांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी इमारतीच्या गच्चीवर भला मोठा स्वतंत्र फिल्टर बसवण्यात आला आहे.