घरमुंबईमहापालिकेच्या ईएनटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ओपीडी, ऑपरेशन थिएटर

महापालिकेच्या ईएनटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ओपीडी, ऑपरेशन थिएटर

Subscribe

रुग्णांवर होणार अत्याधुनिक पद्धतीने उपचार

चर्चगेटजवळील फॅशन स्ट्रीट येथील महापालिकेच्या आत्माराम जयसिंग बाकेबिहारी या ईएनटी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अद्ययावत ओपीडी व मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. अद्ययावत ओपीडी आणि ऑपरेशन थिएटरमुळे हॉस्पिटलमध्ये येणार्‍या रुग्णांना आधुनिक पद्धतीने व तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमुळे कमी त्रासात जलद शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

मुंबई महापालिकेचे फोर्ट परिसरातील आत्माराम जयसिंग बाकेबिहारी हे हॉस्पिटल कान, नाक व घसा यासाठी ओळखले जाते. या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांप्रमाणेच शहरातील आयपीएस, आयएएस, न्यायाधीश, आमदार यासारख्या बड्या व्यक्तीही उपचारासाठी येत असतात. त्यामुळे कान, नाक व घशांसंदर्भातील आजारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार व्हावेत यासाठी महापालिकेकडून हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अशी अद्ययावत ओपीडी सुरू करण्याबरोबरच मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहे. अद्ययावत ओपीडी व मॉड्युलर आपॅरेशन थिएटरचे सोमवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. कान, नाक व घसा यांच्यासंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यासाठी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सुरू करणारे मुंबईतील हे एकमेव रुग्णालय ठरणार आहे.

- Advertisement -

संगणक प्रणालीवर आधारित अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर रुग्णांना तपासण्यासाठी करण्यात येणार आहे. प्रत्येक रुग्णाची इत्यंभूत माहिती संगणकामध्ये कायमस्वरुपी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे रुग्ण कधीही आला तरी त्याला तपासणे डॉक्टरांना सोपे होणार आहे. त्याचबरोबर ओपीडीमध्ये प्रोसिजर रुम बनवण्यात आली आहे. प्रोसिजर रुममध्ये एण्डोस्कोपीची व्यवस्था केली आहे. नाकामध्ये दुर्बीण टाकून कान, घसा व नाकामध्ये झालेल्या संसर्ग, इजा हे सहज पाहता येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे निदान योग्य वेळेत करणे शक्य होणार आहे. पूर्णपणे अद्ययावत असलेल्या ओपीडीमध्ये दररोज सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सात ते आठ डॉक्टर रुग्णांच्या तपासणीसाठी उपलब्ध असणार आहेत. ही ओपीडी पूर्णपणे वातानुकूलित असणार आहे.

आत्माराम जयसिंग बाकेबिहारी कान, नाक व घसा हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या मॉड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये तीन शस्त्रक्रिया कक्ष व पाच शस्त्रक्रिया टेबल असणार आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर हे पूर्णत: जर्मन बनावटीचे आहे. तीन शस्त्रक्रिया कक्ष असल्याने एकाच वेळी कान, नाक व घशासंदर्भातील शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. ऑपरेशन थिएटरमधील मशीनमध्ये पेडल सिस्टिमचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे ऑपरेशन थिएटर पूर्णपणे मोकळे राहणार आहे. मॉड्युलर थिएटरमध्ये पाच टेबल असल्याने एकाच वेळी पाच शस्त्रक्रिया होणार आहेत. ऑपरेशनसाठी कार्बनडाय ऑक्साईड लेझर सिस्टिमचाही वापर करण्यात येणार आहे. या ऑपरेशन थिएटरसाठी अंदाजे दीड कोटी इतका खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती ईएनटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. दीपिका राणा यांनी दिली.

- Advertisement -

गर्दी नियंत्रित करण्यासाठी टोकन सिस्टिम
आत्माराम जयसिंग बाकेबिहारी या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दररोज 400 ते 500 रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे प्रचंड गर्दी होती. गर्दीवर नियंत्रण मिळावे व रुग्णांवर व्यवस्थित उपचार करण्यासाठी डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी हॉस्पिटलमध्ये टोकन सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे. टोकन सिस्टिममुळे डॉक्टरांना मिळणार्‍या पुरेशा वेळेमुळे मेकॅनिकल इफिशियन्सी वाढण्यास मदत होणार आहे.

तोंडाच्या कर्करोगाचे निदान होण्यास मदत
लोकांमधील तंबाखूच्या सेवनाच्या वाढत्या प्रमाणामुळे सध्या तोडांचे कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन या अत्याधुनिक ओपीडीमध्ये ‘वेल स्कोप’ ही अत्याधुनिक यंत्रणाही ओपीडीमध्ये बसवण्यात आली आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात असलेल्या तोंडाचा कर्करोगाच्या रुग्णाचे निदान पटकन होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कर्करोगाला वेळीच आळा घालणे शक्य होणार आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -