घरमुंबई२२,७७४ शौचकुपांंच्या बांधकामाचा मार्ग खुला

२२,७७४ शौचकुपांंच्या बांधकामाचा मार्ग खुला

Subscribe

चार सभांमध्ये रोखून ठेवलेला प्रस्ताव चर्चेविना मंजूर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत बांधल्या जाणार्‍या २२ हजार ७७४ सामुदायिक तसेच सार्वजनिक शौचालयांच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मागील पाच बैठकांमध्ये हा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना अथवा कारणांविना राखून ठेवला जात होता. परंतु बुधवारी झालेल्या सभेत या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता समिती अध्यक्षांनी हा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात प्रस्ताव मंजूर करताना याबाबतची विचारणाच सदस्यांनी प्रशासनाला न केल्यामुळे नक्की हा प्रस्ताव चार बैठकांमध्ये रोखून का ठेवला होता, असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे.


#Live : आता नाशिकची जगाला नव्यानं ओळख होणार; ‘आपलं महानगर’ आजपासून नाशिकमध्ये!मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रकाशन सोहळा | #MyMahanagar

- Advertisement -


१९ डिसेंबर २०१८ च्या सभेपुढे प्रथम हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु त्यानंतर झालेल्या चार ते पाच बैठकांमध्ये हा प्रस्ताव केवळ राखून ठेवण्यात आला होता. समितीमध्ये कोणताही प्रस्ताव राखून ठेवताना त्याचे कारण देणे आवश्यक असते. परंतु याचे कारण न देताच हा प्रस्ताव राखून ठेवला जात होता. याबाबत आपलं महानगरने स्वच्छ भारत अभियानाला शिवसेनेकडून खो घातला जात असल्याचे वृत्त ६ जानेवारी रोजी प्रकाशित केली होती. त्यानंतर भाजपनेही याप्रकरणात लक्ष घालून युती धर्म पाळण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे बुधवारी हा विषय पुन्हा पटलावर आला असता प्रस्तावातील त्रुटीबाबत समितीत उहापोह होईल, मोठी चर्चा होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रत्यक्षात तहकूब असलेल्या या विषयावर कोणालाही चर्चा करू न देता अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे ज्या त्रुटींचे निरसन व्हावे असे अध्यक्ष आणि सदस्यांना वाटत होते, त्या त्रुटी नक्की कोणत्या होत्या आणि त्यावर चर्चा का झाली नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

- Advertisement -

शौचालयांचे एक, दुमजली बांधकाम होणार

मुंबईतील सर्व विभागांमध्ये आर.सी.सी शौचालयांचे नियोजन, संकल्पचित्रे व बांधकाम करणे तसेच शौचालयांचे मलकुंड साफ करण्यासाठी टप्पा ११ अंतर्गत महापालिकेने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. टप्पा ११ अंतर्गत आता एकूण २२ हजार ७७४ शौचकुपे बांधण्यात येणार आहेत. एक मजला तसेच दोन मजल्यांचे बांधकाम याप्रकारे २३ भागांमध्ये विभागून शौचालयांचे बांधकाम होणार आहे. यामध्ये अंदाजित खर्चाच्या तुलनेत १८ ते २५ टक्के अधिक दराने बोली लावत कंत्राटदाराने कंत्राटे मिळवली आहेत. विधी एंटरप्रायझेस, एपीआय सिव्हीलकॉन प्रा.लि, व्हीएनसी इन्फ्राप्रोजेक्ट या कंपन्यांना प्रत्येकी तीन भागांची कामे तर एम.एम. कन्स्ट्रक्शन, एसी कार्पोरेशन आणि डी.बी.इन्फ्राटेक या कंपन्यांना प्रत्येकी दोन भागांची कामे मिळाली आहे. उर्वरीत आठ भागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -