अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फोडला; विरोधकांचा सरकारविरोधात निषेध

अर्थसंकल्प सादर करत असताना त्यातील मुद्दे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात येत होते. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फुटल्यामुळे विरोधकांनी याप्रकरणी निषेध व्यक्त केला आहे.

Mumbai
opponent aggressive
विरोधक आक्रमक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपसेना सरकारचा शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात मंगळवारी सादर केला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर विधानपरिषदेत अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यातील मुद्दे हे सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यात येत होते. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घालत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच फोडला असल्याचा आरोप केला. त्यानंतर आज, बुधवारी विरोधकांनी याचा निषेध करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. तसेच यासंदर्भात चौकशी करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे.

ट्विटरवर अर्थसंकल्प फुटला

राज्याचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. मात्र, हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच सोशल मीडियावर फोडला गेला होता. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी फोडला कसा जातो?, असा सवाल आज विरोधकांनी विधानभवनात केला आहे. त्याच्या निषेधार्थ विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोणाबाजी केली आहे. अर्थसंकल्प सादर होत असताना त्याची ट्विटर माहिती देण्यात येत होती. याप्रकरणी सायबर सेलमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे.

सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे

राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्याऐवजी तो बाहेर अगोदरच फुटलेला होता त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष आणि सायबर क्राईमच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प विधानसभेत मांडला परंतु त्याची माहिती अगोदरच बाहेर पडली. ही बाब आम्ही निदर्शनास आणून दिल्यावर अध्यक्षांनी आणि सभापतींनी चौकशी करण्याचे काम केलेले नाही असेही जयंत पाटील म्हणाले. विधानसभेत मांडलेला अर्थ संकल्प अगोदरच ट्वीटच्या माध्यमातुन बाहेर समजत होता. त्याची जाहिरात जी करण्यात आली ती बाहेर कुणाला तरी सांगून करण्यात आली होती, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. सभागृहात मांडलेला अर्थ संकल्प फुटण्याचे हे महाराष्ट्रातील पहिले प्रकरण आहे आणि हा अर्थसंकल्प फोडण्याचे काम अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी ट्विटच्या माध्यमातुन केले आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

अर्थसंकल्प फुटणे हे साधे प्रकरण नाही. मुख्यमंत्री कितीही समजून सांगत असले तरी ते त्यांनी कधी केले आणि याची माहिती कोणाला दिली या सगळ्यांची सर्वकष चौकशी झाली पाहिजे. ट्विट जे करत होतात तेसुद्धा वेळेच्या आत लोकांपर्यंत पोचत होते. विशेष म्हणजे त्यांचे ट्वीट आमच्याकडे घोषणा होण्याअगोदर पोचत होते. यामध्ये काळंबेरं नक्की आहे का? यामध्ये कुणाचा फायदा करुन देण्याचे काम झाले का? याची विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशी करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.


हेही वाचा – फडणवीसांची टीम आणि मोदींचा फॉर्म्युला

हेही वाचा – नाथाभाऊंच्या बाजूने विरोधकांची घोषणाबाजी; खडसेंचे पवारांसोबत हस्तांदोलन