घरमुंबईमागणी नसल्याने मच्छिमारांनी फेकले समुद्रात मासे

मागणी नसल्याने मच्छिमारांनी फेकले समुद्रात मासे

Subscribe

दर आणि मागणी नसल्याने शेतकरी कांदा आणि भाजीपाला रस्त्यावर फेकून देतात. असे अनेकदा घडलेले आहे. पण, आता मच्छिमारांनाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे अर्नाळा समुद्रकिनारी फेकण्यात आलेल्या माशांवरून उजेडात आले आहे. अर्नाळा किल्ला गावातील मच्छिमारांनी दर आणि मागणी नसल्याने मासे पुन्हा समुद्रात फेकून दिले. या माशांचा ढिग आता अर्नाळा किनार्‍यावर साचला आहे.

ओल्या दुष्काळाने मच्छिमारांचे कंबरडे मोडले आहे. दोन महिन्यांनी मासेमारीचा हंगाम नुकताच सुुरु झाल्याबरोबरच मच्छिमारांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अर्नाळा किल्ला गावात शंभरहून अधिक छोट्या बोटी आहेत. त्या दिवसभर मासेमारी करून संध्याकाळी अर्नाळा किनार्‍यावर मासे विकण्यासाठी येतात. गुरुवार एकाचवेळी अनेक बोटी किनार्‍यावर आल्या. विशेष म्हणजे या बोटींना बोंबिल मासे मोठ्या प्रमाणावर लागले. पण, किनार्‍यावर मासे विकत घ्यायला फारसे व्यापारी नव्हते. त्यातच श्रावणाचा महिना, त्यामुळे आवक जास्त आणि मागणी कमी. अखेर जेवढे मासे शिल्लक राहिले ते समुद्रात फेकून द्यावे लागले. शुक्रवारी सकाळी अर्नाळा समुद्रकिनारी वाहून आलेल्या माशांचा ढिग लागला.

- Advertisement -

अर्नाळा किल्ल्यात कोल्ड स्टोरेज आणि बर्फ कारखाना नाही. बर्फ महाग असल्याने विकत घेऊन मासे साठवल्यानंतर तसा दरही मिळत नाही. मासे साठवून ठेवण्यासाठी साधनसामुग्री नसल्याने त्यांना उरलेला माल पुन्हा समुद्रात फेकून द्यावा लागतो. अर्नाळा किल्ल्यात शंभरहून अधिक मासेमारी बोटी आहेत. मात्र, गावात डिझेल पंप नाही. तिथे असलेली सोसायटी अर्नाळ्यातून डिझेल नेऊन बोटींना पुरवते. ड्रममधील डिझेल बोटीतून किल्लयात न्यावे लागते. त्यामुळे कधीकधी बोट कलंडून डिझेल समुद्रात वाहूुन जाण्याचेही प्रकार घडत आहे.

अर्नाळा किल्ला गावातील मच्छिमारांना कोणत्याच सोयीसुविधा नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मासे समुद्रात फेकण्याची वेळ अनेकदा येते. सध्या आवक वाढली असली तरी मागणी खूपच कमी आहे. मासे साठवण्याची सोय नसल्याने समुद्रात फेकून नुकसान सहन करावे लागते. यावर तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे. नाहीतर मच्छिमारांची अवस्था शेतकर्‍यांसारखी झाल्याशिवाय राहणार नाही.
-राजू तांडेल, मच्छिमार नेते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -