भिवंडीतून 25 कोटीचे पॅकेजिंग मटेरियल जप्त

एचपी, केनॉन , सॅमसंगच्या वस्तू

Mumbai
अटक

भिवंडी तालुक्यातील वळगाव ग्रामपंचायत हद्दीतील वळपाडा येथील पारसनाथ कंपाउंड गाळा नंबर 8 येथे एचपी, केनॉन, सॅमसंग व इपसोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे 25 कोटींहून अधिक रकमेचे पुठ्ठ्याचे साहित्य गुरुवारी सायंकाळी छापा टाकून जप्त करण्यात आले. या प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पोलीस संकुलात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबतीत मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलीस सखोल तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

किशोर आंबा बेरा ( 28 रा. गणेश चाळ, ठाणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याने त्याच्या पारसनाथ कंपाउंड येथील गोदामात एचपी, केनॉन , सॅमसंग व इपसोन या नामवंत इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे 25 कोटींहून अधिकचे पुठ्ठ्याचे केवळ रिकामे बॉक्स गोदामात छापा टाकून जप्त केले आहे. या ठिकाणी अनधिकृतपणे पॅकेजिंग साहित्य ठेवण्यात आले असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी नारपोली पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे कॉपीराईट अ‍ॅक्ट अन्वये करण्यात आलेली ही देशातील मोठ्या कारवायांपैकी एक कारवाई असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिंदे यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत नामांकित कंपन्यांचे प्रिंट केलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स पत्रकार परिषदेत दाखविण्यात आल्या. ठाणे पोलीस आयुक्त डॉ. विवेक फणसळकर यांनी केलेल्या उत्तुंग कामगीरीचे भिवंडी पोलीसांचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here