शिवसेनेचा पालघरमध्ये कार्यकर्त्यांना ‘हायअलर्ट

uddhav thackery
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे

पालघर लोकसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून, आपल्या कार्यकर्त्यांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. सेनेने ठाणे आणि मुंबईतल्या कार्यकर्त्यांची फौज पालघरमध्ये रवाना केली आहे. संभाव्य पैसेवाटीकडे करडी नजर ठेवण्यास या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. शनिवारी ही निवडणूक होणार असल्याने रात्रीचा दिवस करा, अशा सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

श्रीनिवासयांचा कुटुंबियांसह शिवसेनेत प्रवेश

चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांनी त्यांच्या कुटुंबियांसह शिवसेनेत प्रवेश घेतला. सेनेने श्रीनिवास यांना उमेदवारी देण्याचे जाहीर करताच भाजपची जळफळाट झाली. सेनेने श्रीनिवास यांना उमेदवारी देऊ नये, असा दबाव मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय नेतृत्वाने सेनेवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला सेनेने जराही किंमत दिली नाही. यावर पर्याय म्हणून भाजपने काँग्रेसमधून आयात केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी देऊन सेनेपुढे आव्हान उभे केले. दुसरीकडे सेनेचे कडवे विरोधक असलेल्या नारायण राणे यांना प्रचारात उतरवून भाजपने सेनेपुढे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कठीण प्रसंगी पराभव पत्करणे दोन्ही पक्षांना अवघड जात आहे. सेनेकडे कार्यकर्त्यांची फळी असली तरी आर्थिकदृष्ट्या तो पक्ष भाजपशी बरोबरी करू शकत नाही. हे सेनेच्या नेत्यांनाही ठावूक आहे. भाजपच्या विजयाचे बरेचसे श्रेय हे आर्थिक प्राप्तीत असल्याचे एव्हाना सर्वच मान्य करतात. सेनेपुढे हे आव्हान आहे. यासाठी सेनेने आपल्या कार्यकर्त्यांना अॅलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

स्थानिक कार्यकर्त्यांना सजग राहण्याच्या सूचना

सेनेच्या मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना पालघरमध्ये पाठवण्यात आले आहे. शुक्रवारची रात्री जागून काढण्यास सांगताना स्थानिक कार्यकर्त्यांनाही सजग राहण्याच्या सूचना देण्यात अल्या आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here