घरमुंबईपारसिक रेल्वे स्टेशनला कोणाचा खोडा?

पारसिक रेल्वे स्टेशनला कोणाचा खोडा?

Subscribe

श्रेयाच्या राजकारणात पाठपुरावा रखडला

मागील अठरा वर्षापासून कळव्यातील खारीगाव आणि पारसिक परिसरातील नागरिकांची पारसिक रेल्वे स्थानकाची मागणी आहे. कळवा आणि मुंब्रा यामधील भागात पारसिक रेल्वे स्थानकाची निर्मिती व्हावी, ज्यामुळे खारेगाव, पारसिक, विटावा, रेतीबंदर येथील लाखो नागरिकांना फायदा होईल. मात्र ही मागणी रेल्वे प्रशासनापर्यंत पोहचवण्यास येथील लोकप्रतिनिधींचे राजकारण आडवे येत आहे. पारसिक रेल्वे स्थानक झाले तर श्रेय कुणाचे? हा प्रश्न ठामपातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला भेडसावत असल्यानेच या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही. परिणामी सत्ताधार्‍यांनीच या मार्गाची वाट अडवल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.

या ठिकाणी व्यापक जनाधार मिळत नसल्याचे कारण देत ठामपाच्या सत्ताधारी पक्षांनी याकडे कायमच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिकांची पारसिक रेल्वे स्थानकाची मागणी अद्यापही कागदोपत्रीच आहे. कळवा रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी आणि पारसिक, खारेगाव येथील वाढत्या लोकसंख्येमुळे हे स्थानक काळाची गरज आहे. यामुळे ठाणे स्थानकावरील भारही कमी होऊन या पट्ट्यातील रेल्वे अपघात रोखणे शक्य होईल, इतकेच नव्हे तर त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय वाचेल. कळवा-ऐरोली लिंकमुळे कळवा स्टेशनवरील ताण हलका होण्यास मदत होईल. अशी अनेक व्यवहार्य कारणे असताना या स्थानकाच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करित आहे. डोंबिवली जवळचे कोपर, मुलुंड नंतरचे नाहूर, गोरेगाव नंतरचे ओशिवरा या स्थानकांना रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी दिली जाते. मात्र त्यांच्या आधीपासून असलेल्या पारसिक रेल्वे स्थानकाची मागणी अद्यापही पूर्ण होत नाही, यामागे कोणते राजकारण आहे. असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.

- Advertisement -

भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. त्यापुढे पारसिक डोंगरावर पर्यटनासाठी जाणार्‍या ब्रिटीश अधिकार्‍यांसाठी पारसिक परिसरामध्ये रेल्वे गाडी थांबवली जात होती. मात्र कालांतराने पारसिकऐवजी कळव्यातील मफतलाल कंपनीच्या कर्मचायांसाठी नवा थांबा विकसित करण्यात आला. पुढे कळवा स्थानकाचा विकास झाला परंतु जुन्या पारसिक स्थानकाच्या पाऊलखुणा पुसून गेल्या. त्यामुळे खारेगांव आणि पारसिक परिसरामध्ये राहणारे रहिवासी आणि कळवा-पारसिक रेल्वे प्रवासी संघटना अनेक वर्षापासून पारसिक स्थानकाच्या निर्मितीच्या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासिन धोरणामुळे ही मागणी अद्यापही कागदावरच राहिली आहे.

2014 मध्ये मी याबाबत तत्कालीन रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांची भेट घेऊन त्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यावेळी पारसिक, खारेगाव येथील वाढत्या लोकसंख्येकरता या स्थानकाची आवश्यकता त्यांना सांगितली. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे आणि अनास्थेमुळे या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. पारसिक रेल्वे स्थानक अत्यंत गरजेचे असून त्यासाठी आम्ही आग्रही असून लवकरच यावर निर्णय घेण्यासाठी मंत्रालयाला भाग पाडू.
– खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

- Advertisement -

पारसिक भागात विकास झालाच नाही. पूर्वेकडे डोंगरावर असलेली झोपडपट्टी हीच त्यांची ओळख असल्याने ही मागणी फायद्याची नसल्याचे सत्ताधार्‍यांना वाटते. या परिसरात मोठ मोठी गृहसंकुले उभी राहिली असती किंवा मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या नसल्याने हा भाग नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मात्र पारसिक स्थानकामुळे खारीगाव, पारसिक, घोडबंदर, विटावा, रेतीबंदर येथील लाखो नागरिकांना फायदा होईल, ठाणे स्थानकावरील ताण 30 टक्क्यांनी कमी होईल. कळवा पुलावरील वाहतूककोंडी थांबेल.
सिद्धेश देसाई, कळवा-पारसिक रेल्वे प्रवासी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -