मेड इन मुंबई लोको धावणार हिमाचल पर्वतात

परळ लोको वर्कशॉपने कोरोना काळात उत्तर रेल्वेसाठी पाचवे झेडडीएम 3 नॅरो गेज इंजिन तयार करुन शनिवारी पाठविण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपने कोरोना काळात उत्तर रेल्वेसाठी पाचवे झेडडीएम 3 नॅरो गेज इंजिन तयार करुन शनिवारी पाठविण्यात आले आहे. उत्तर रेल्वेच्या अंबाला विभागातील कालका-शिमला रेल्वे विभागातील प्रवासी आणि मालगाड्या चालविण्यासाठी या लोकोचा उपयोग केला जाणार आहे. कालका-शिमला रेल्वे हा 2 फूट 6 इंचाचा (762 मिमी) गेजचा रेल्वे मार्ग आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कालका ते हिमाचल पर्वत प्रांतातील शिमलापर्यंत हा मार्ग आहेृ. हा रेल्वे मार्ग 97 कि.मी. लांबीचा असून 1400 मीटर उंचीवर जातो. या रेल्वेला युनेस्कोचा जागतिक वारसा मिळालेला आहे.

मुंबईतून पाचवे इंजिन रवाना

मध्य रेल्वेच्या परळ लोको वर्कशॉपला उत्तर रेल्वेने 2019 मध्ये 12 झेडडीएम-3 नॅरो गेज इंजिन तयार करण्याची ऑर्डर दिली होती. त्यानुसार आतापर्यंत 12 पैकी चार इंजिने तयार करून पाठविण्यात आली आहेत. शविवारी पाचवे इंजिन तयार करुन पाठविण्यात आले आहे. आता उर्वरित 7 इंजिने तयार करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आलेला होता. मात्र मर्यादित स्त्रोत आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे पालन करून लोकोच्या उत्पादनाचे काम सुरू होते. लॉकडाऊन/अनलॉक कालावधी दरम्यान उत्पादित केलेले हे तिसरे इंजिन असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

इंजिनची वैशिष्ठ्ये

कालका-शिमला रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूने चालविण्यासाठी व पुढे व्यवस्थित दिसण्यासाठी या इंजिनमध्ये दुहेरी कॅब बसविण्यात आली आहे. उत्तर भारतातील हिवाळ्यातील कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी इंजिन कोल्ड स्टार्टने सुसज्ज आहेत. आवश्यकतेनुसार इंजिन थंड करण्यासाठी ‘ऑन डिमांड कूलिंग सिस्टम’ ने देखील इंजिन सुसज्ज आहेत. एअर ब्रेक्स ब्रॉडगेज इंजिनासारखेच आहेत. डिझेल इंजिनाची कार्यप्रणाली इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर प्रदर्शित केली जाते. इंजिनमध्ये ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, सतर्कता नियंत्रण डिव्हाइस आणि रेकॉर्डरसह इलेक्ट्रॉनिक स्पीडोमीटरसारख्या वैशिष्ठ्यांसह सुरक्षितता सुविधादेखील उपलब्ध आहेत.