हमीपत्र देण्याविषयी पालक संभ्रमात

शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु अनेक पालकांनी शाळांना हमीपत्र दिले नाही. हमीपत्राबाबत पालक संभ्रमात असल्याने ऑफलाईन वर्गांला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी करण्यास सुरूवात झाली आहे. परंतु अनेक पालकांनी शाळांना हमीपत्र दिले नाही. हमीपत्राबाबत पालक संभ्रमात असल्याने ऑफलाईन वर्गांला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शाळांना पुरविण्याच्या सुरक्षा साधनांची जबाबदारी जिल्हा परिषद आणि महापालिकांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार महापालिका, जिल्हा परिषदांमार्फत शिक्षकांची आरसीपीटीआर चाचणी, शाळांचे सँनिटाझेशन करण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई विभागातील महापालिका आणि इतर खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची वार्डनिहाय अँटीजन किंवा आरटीपीसीआर चाचणी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. मुंबई विभागात वास्तव्यास असणार्‍या शिक्षकांना त्यांच्या राहत्या घराजवळील आरोग्य केंद्रावर चाचणी करता येणार आहे. या चाचणीसाठी जाताना शिक्षकांना आधारकार्ड तसेच शाळेचे ओळखपत्र सोबत नेणे आवश्यक आहे. पालकांच्या समंतीशिवाय मुलांना शाळेत प्रवेश देऊ नये, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी पालकांना हमीपत्राविषयी माहिती दिली आहे. तसेच शालेय वेळापत्रक, शिक्षकांची उपस्थिती, शाळेत आणायच्या वस्तू याविषयीही कळविले आहे. मात्र, निम्म्याहून अधिक पालकांकडून मुख्याध्यापकांना हमीपत्र दिलेले नाही. यामुळे प्रत्यक्ष सुरू होणार्‍या शाळेला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुसंख्य पालक पाल्याला शाळेत पाठविण्याच्या तयारीत दिसत नाहीत. कोरोनाच्या भितीमुळे पालकांची पसंती ऑनलाइन शिक्षणाला असून अद्यापही बरेच विद्यार्थी त्यांच्या मूळ गावीच आहेत. तर काही पालकांनी डिसेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी दर्शविली असल्याचे, एका शिक्षकाने सांगितले.

१५० शाळांचे निर्जुंतुकीकरण पूर्ण

शिक्षण विभागाकडून शाळांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश प्राप्त होताच मुंबई महापालिकेने सर्व माध्यमिक शाळांचे तातडीने निर्जुंतुकीकरण पूर्ण केले आहे. २० ते २३ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा एकदा सर्व १५० शाळांचे निर्जंतुकीकरण केले जाईल, असे पालिका अधिकार्‍याने सांगितले. ज्या शाळांमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले होते. त्यांचेही निर्जुंतुकीकरण पूर्ण झाले असल्याचेही या अधिकार्‍याने सांगितले.

कोरोनाची भिती अद्यापही पालकांच्या मनात आहे. त्यामुळे बहुतांश पालकांनी अद्यापही आम्हाला हमीपत्र दिलेले नाही. परिणामी केवळ २५ टक्के विद्यार्थीच प्रत्यक्ष शाळेत येतील.
– प्रशांत रेडीज,सचिव,मुंबई मुख्याध्यापक संघटना