गिरगावात रस्ता खचला, रस्ते वाहतुक वळवली

Girgaon road

कुलाबा वांद्र सिप्झ भुयारी मेट्रो ३ प्रकल्पाच्या कामाअंतर्गत असलेला रस्ता गिरगाव येथे खचला आहे. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. दरम्यान या भागातील रस्ते वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली असल्याची माहिती आहे. गिरगावातील क्रांतीनगर (धोबीघाट) परिसरातील हा रस्ता आहे. गिरगावातून गायवाडीच्या दिशेने जाणाऱ्या दिशेटने हा रस्ता खचण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान या भागातील वाहतुक ही वळविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

गिरगाव परिसरात मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे काही भागात बॅरिकेडिंगचे काम मेट्रोमार्फत करण्यात आले आहे. तर काही भागात कट एण्ड कव्हर पद्धतीने मेट्रोचे काम सुरू आहे. गिरगावात सातत्याने पाणी साचण्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. इतक्या वर्षात गिरगावात कधीच पाणी साचले नाही. पण मेट्रोच्या कामामुळे या भागात इतक्या वर्षात पहिल्यांदाच पाणी साचल्याची माहिती नागरिकांकडूनच समोर आली होती. गिरगावात अनेक भागात पाणी साचल्याचाच परिणाम म्हणून हा रस्ता खचला असावा असा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. याआधीही गणेश चौकात मुगभाट लेन येथे काही वर्षांपूर्वी रस्ता खचल्याचा प्रकार समोर आला होता.

मेट्रोच्या कामानिमित्त डंपर आणि टॅंकर अशा जड वाहनांची वर्दळ या क्रांतीनगर भागात असते. त्यामुळेच या रस्त्यांवर नेहमीच वाहतुक कोंडी असल्याचे पहायला मिळते. काही दिवसांपूर्वी क्रांती नगर या भागातून काही चाळीतील नागरिकांचे स्थलांतर करून त्या भागात मेट्रोमार्फत स्टेशन उभारणीचे काम सुरू झाले होते. याच परिसरात ही रस्ता खचल्याची घटना आज सकाळी झाली. पण या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.