घरमुंबईCooper Hospital : कोरोना वॉर्डमध्ये नातेवाईकांकडूनच रुग्णसेवा

Cooper Hospital : कोरोना वॉर्डमध्ये नातेवाईकांकडूनच रुग्णसेवा

Subscribe

कूपर हॉस्पिटलमध्ये कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याचे सांगत खुद्द नातेवाईकांनाचा कोविड वॉर्डमध्ये प्रवेश देत त्यांची सेवा करण्यास सांगितले जात आहे. तसेच नातेवाईक हजर नसेल तर त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रकार घडत आहे.

कोरोना रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. या वॉर्डमध्ये रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. मात्र कूपर रुग्णालयामध्ये कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याचे सांगत खुद्द नातेवाईकांनाचा कोविड वॉर्डमध्ये प्रवेश देत त्यांची सेवा करण्यास सांगितले जात आहे. तसेच नातेवाईक हजर नसेल तर त्याला पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांचा जीवही हॉस्पिटलकडून धोक्यात घातला जात असल्याबद्दल नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाची लागण होणार्‍या व्यक्तीला विलगीकरण कक्षात ठेवणे बंधनकारक असते. त्यामुळे कोरोनाची लागण होणार्‍या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात येते. या वॉर्डमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही. रुग्णांना वॉर्डच्या बाहेरूनही भेटण्याची परवानगी दिली जात नाही. असे असताना पालिकेच्या जुहू येथील कूपर रुग्णालयात या नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात येत आहे. कूपर रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर सी वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. मात्र कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांनाच त्यांची सुश्रुषा करण्यास सांगण्यात येत आहे. याबाबत वॉर्डमधील परिचारिकांकडे नातेवाईकांनी चौकशी केली असता रुग्णालयात कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याचे कारण सांगण्यात येते. तसेच रुग्णासोबत नातेवाईक उपस्थित नसेल तर नातेवाईकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी ही रुग्णालयाकडून देण्यात येते. त्यामुळे नाईलाजास्तव नातेवाईकांना कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांसोबत राहून त्यांची सेवा करावी लागत आहे. रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण हे १० ते १५ दिवसांपासून उपचार घेत आहेत. या रुग्णांची सुश्रुषा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना वॉर्डमध्येच थांबण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले नातेवाईक रुग्णालय ते घर असा प्रवास करताना कोरोनाचा प्रसार करत आहेत. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करत असताना पालिकेचे महत्त्वाचे रुग्णालय असलेल्या कूपर रुग्णालयातच सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत नातेवाईकांनाच कोरोना रुग्णांची सेवा करण्यात सांगण्यात येत आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये भीतीबरोबरच संतापाचे वातावरण पसरले आहे.

कोणत्या कोरोना वॉर्डमध्ये रुग्णांना थांबण्यास सांगण्यात येत आहे, याबाबत मी माहिती घेतो. त्यानंतर संबंधित वॉर्ड प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. पिनाकिन गुज्जर, अधिष्ठाता, कूपर रुग्णालय
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -