Saturday, August 8, 2020
Mumbai
28.6 C
घर CORONA UPDATE हे कवच करणार डॉक्टरांसह कोरोना योद्धांचे संरक्षण

हे कवच करणार डॉक्टरांसह कोरोना योद्धांचे संरक्षण

कोरोना योद्धयांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जे.जे. हॉस्पिटलमधील सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी पुढाकार घेत ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’ बनवले आहे.

Mumbai

कोरोना रुग्णांना वॉर्डमधून चाचण्यांसाठी विविध विभागात नेताना चतुर्थ श्रेणी कर्मचारी, परिचारिका व डॉक्टर यांचा रुग्णांशी थेट संपर्क येतो. यामुळे कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धयांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी जे.जे. हॉस्पिटलमधील सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी पुढाकार घेत ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’ बनवले आहे. यामुळे आता कोरोना योद्ध्येही संरक्षित होणार आहेत.

तब्बल दीड महिना ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’वर काम

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचारी कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात होत होती. कोरोनाची लागण झाल्याने कोरोना योद्धेही क्वारंटाईन होऊ लागल्याने हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे. कोरोना रुग्णांना सीटी स्कॅन, एक्स रे, रक्त तपासणी व शस्त्रक्रियागृहात नेताना त्यांचा कर्मचारी व परिचारिका यांच्याशी संपर्क येत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कर्मचारी व परिचारिका यांना संसर्ग होऊ नये यासाठी जे.जे. हॉस्पिटलमधील सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी पुढाकार घेतला. रुग्णांना अन्यत्र नेताना अन्य देशांमध्ये कोणत्या साधनांचा वापर केला जातो याची पाहणी करून केली असता उपलब्ध उपकरणांची किंमत ही दोन ते तीन लाखांपेक्षा अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोरोना रुग्णांना अन्यत्र नेताना त्यांचा संपर्क  डॉक्टर, परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्याशी येऊ नये यासाठी त्यांनी काही उपाययोजना करण्याच्या उद्देशाने डॉ. भंडारवार यांनी ‘इंडोमेड डिवाईस’च्या इंजिनियर्ससोबत चर्चा केली. यातूनच त्यांना ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’ची कल्पना सुचली. तब्बल दीड महिना यावर काम केल्यानंतर इंडोमेड डिवाईनच्या इंजिनियर्संना कवच बनवण्यात यश आले.

अवघ्या ५० हजारामध्ये कवच उपलब्ध

जे.जे. हॉस्पिटलच्या सर्जिकल स्किल लॅबमध्ये हे कवच बनवण्यात आले आहे. या कवचला काचेचे आवरण असल्यामुळे कोरोना रुग्णांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेताना त्याचा कर्मचारी व डॉक्टरांशी कोणताही संपर्क होणार नाही. तसेच त्यामध्ये हवा आत बाहेर होण्यासाठी छिद्रे असल्याने रुग्णाला श्वासोच्छवास घेण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे रुग्णाशी कोणताही संपर्क न करता त्याला हॉस्पिटलअंतर्गतच नव्हे तर अन्य हॉस्पिटलमध्येही नेणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होणार आहे. हे कवच अवघ्या ५० हजारामध्ये उपलब्ध होणार आहे. याच्या वापराला वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडूनही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे कोणत्याही हॉस्पिटलला  वापरता येणार आहे. त्यामुळे आता कोरोना योद्धांचा कोरोना रुग्णांशी होणारा संपर्क रोखणे शक्य होणार आहे, अशी माहिती सर्जरी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमोल वाघ यांनी दिली.

डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही हे कवच तयार केले आहे. भारतामध्ये कोणालाही या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी सामाजिक भावनेतून कवच बनवण्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आम्ही सर्वांसाठी खुले ठेवले आहे. कवचमुळे रुग्णांना हॉस्पिटलअंतर्गतच नव्हे अन्य हॉस्पिटलमध्येही नेता येणार आहे.
– डॉ. अजय भंडारवार, सर्जरी विभागप्रमुख, जे.जे. हॉस्पिटल

अ‍ॅम्ब्युलन्स कवचही बनवणार

कोरोना रुग्णांना अन्यत्र नेताना संसर्ग होऊ नये यासाठी ‘पेशंट ट्रान्सपोर्ट कवच’ बनवल्यानंतर आम्ही आता याचे अ‍ॅम्ब्युलन्स व्हर्जन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. अ‍ॅम्ब्युलन्समधून रुग्णांची ने-आण करताना होणारा संसर्ग रोखता यावा यासाठी आम्ही अ‍ॅम्ब्युलन्स व्हर्जन बनवण्याचा विचार करत असल्याचे डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here