‘त्या’ आरोपींना नायरमध्ये ‘नो एन्ट्री’

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

Mumbai
dr payal tadvi
डॉ. पायल तडवी

नायर हॉस्पिटलात डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणामुळे अद्याप वातावरण चांगले झाले नाही. या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पुन्हा हॉस्पिटलात आल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटेल, असे नायर हॉस्पिटलच्या प्रशासनाने मुंबई हायकोर्टात सांगितल्याने न्यायमूर्ती साधना जाधव यांनी या आरोपींना शिक्षण पूर्ण करण्यात परवानगी नाकारली. डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणात डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल व भक्ती मेहर या तिघी आरोपी असून, त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जामीन देताना नायर हॉस्पिटलात कधीही न जाण्याची अट घातली होती. त्यांना पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे असल्याने नायर हॉस्पिटलात जाऊ देण्याची परवानगी त्यांनी अर्जाद्वारे मागितली होती.

या तिघींनी अ‍ॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज केला होता. ‘आरोपींना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही’, असे निरीक्षण न्यायमूर्ती साधना जाधव यांनी नोंदवून या तिघींना नायर हॉस्पिटलातच अन्य एखाद्या विभागात पोस्टिंग देऊन पद्व्युत्तर शिक्षण पूर्ण करू दिले जाऊ शकते का, याची माहिती देण्यासाठी न्यायमूर्तींनी नायर हॉस्पिटलच्या स्त्री रोग विभागाच्या प्रमुखांना कोर्टात बोलावले होते. मात्र नायर हॉस्पिटलात आजही त्या घटनेने वातावरण चांगले नाही. आपण गुरुवारी सर्व संबंधितांची बैठक घेतली. त्यात असे समोर आले की, या तिघी आरोपी डॉक्टर पुन्हा हॉस्पिटलात आल्या तर चांगले होणार नाही. प्रतिक्रिया उमटतील आणि त्यानंतर आरोपींना काही झाल्यास त्याची जबाबदारी हॉस्पिटलची राहणार नाही,’ असे हॉस्पिटला वतीने स्पष्ट करण्यात आले. हॉस्पिटलची यासंदर्भात भूमिका ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती साधना जाधव यांनी त्यांना नायर हॉस्पिटलात शिक्षण पूर्ण करण्यास तूर्तास परवानगी देण्यास नकार दिला.