घरमुंबईएक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची... सोशल माध्यमातून नागरिकांना आवाहन

एक पोळी होळीची, भुकेलेल्या मुखाची… सोशल माध्यमातून नागरिकांना आवाहन

Subscribe

होळी रे होळी..., पुरणाची पोळी, असे म्हणत सर्वच ठिकाणी जोरदारपणे होळी हा सण साजरा केला जातो. यामध्ये दरवर्षी करोडो पोळ्यांची या होळीला नैवेद्याच्या नावाखाली राख होते. मात्र हीच पोळी गरजूंना दिली तर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे आनंदायीच असेल.

होळी रे होळी…, पुरणाची पोळी, असे म्हणत सर्वच ठिकाणी जोरदारपणे होळी हा सण साजरा केला जातो. यामध्ये दरवर्षी करोडो पोळ्यांची या होळीला नैवेद्याच्या नावाखाली राख होते. मात्र हीच पोळी गरजूंना दिली तर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे आनंदायीच असेल. याच धर्तीवर होळी लहान करा व पोळी दान करा असा वाखाणण्याजोगा उपक्रम अंधश्रध्दा निर्मूलन समिती गेल्या दहा वर्षापासून राज्यभर राबवित आहेत. यंदाच्या वर्षी नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्हॉटसअॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आहे.

अंनिसच्या माध्यमातून उपक्रम 

होळी हा सण कोकणासह राज्यात सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बुधवार, २० मार्च रोजी होळी आहे. त्यामुळे होळीच्या तयारीची जय्यत सुरूवात झाली आहे. होळीच्या दिवशी सायंकाळी होळीला पुरणाच्या पोळीचा नैवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी लाखो पोळ्यांची राख होते. मात्र ही पोळी जर कोणा भुकेल्या आणि गरीबाला खायला मिळाली तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणे हे कितीतरी सुखाचे आहे. याच संकल्पनेवर आधारीत अंधश्रध्दा निर्मुलन समिती काम करत आहे. यंदाच्या वर्षीही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरु असल्याचे अंनिसच्या डोंबिवली समितीच अध्यक्षा सुशिला मुंडे यांनी सांगितले. अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्यावतीने ठिकठिकाणी होळीच्या नैवेद्यासाठी होळीत टाकणारी पोळी जमा करून झोपडपट्टी विभाग तसेच गरीब तसेच गरजूंना वाटप केली जाते. गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेल्या उपक्रमाला लोकांकडून प्रतिसाद वाढत आहे. तसेच होळीसाठी लाकूड व शेणी न जाळता ते शैक्षणिक संस्थांना अन्न शिजविण्यासाठी देण्यात यावे, असेही आवाहन अनिसंकडून करण्यात आलं आहे. दरवर्षीच या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळतो. या पोळ्या जमा करण्यासाठी आम्ही प्रत्येक होळीच्या ठिकाणी २० जणांची टीम तयार केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आमच्या ३५० शाखा असून राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार आहे, असे मुंडे यांनी सांगितलं.

- Advertisement -

शाळेत होणार दुर्गुणांची होळी

दोन फुटांच्या वर होळी करू नका, असे आवाहनही करण्यात येते. शाळेतील मुलांकडून कचरा काढून त्यांच्याच शाळेतील कचरा जाळुन होळी साजरी करण्यात येणार आहे. तसेच कधीही खोटे बोलू नये,चांगले वागा, अशा आशयाचे फलक बनवून दुर्गुणांचा नाश करणारी होळी आम्ही मुलांसोबत साजरी करणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. कारण हिच मुले उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांच्यातच हे संस्कार घडवणे गरजेचे आहे, असं मत अंनिसच्या मुंडे यांनी व्यक्त केलं. त्यामुळे शाळांमध्ये दुर्गुणांची होळी साजरी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -