घरमुंबईयंदा राजकारण्यांकडून उटण्यासोबत कंदीलही मिळणार!

यंदा राजकारण्यांकडून उटण्यासोबत कंदीलही मिळणार!

Subscribe

दरवर्षी दिवाळी आली कि आपल्या घरी हमखास आमदार किंवा नगरसेवक किंवा स्थानिक नेत्याकडून सुगंधी उटण्याची पाकिटे भेट म्हणून दिली जातात. अनेकांच्या घरी उटण्याची दहा-दहा पाकिटे साठतात. पण यंदा तुम्हाला उटण्यासोबत कदाचित कंदिलही मिळू शकतो आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन..तर थांबा..त्याचे कारणही खास असेच आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्ष कामाला लागले असून, येन केन प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा राजकारणी प्रयत्न करत आहेत. त्यातच सण म्हटले की मतदारांपर्यंत पोहोचण्याची राजकारण्यांना नामी संधी. म्हणूनच तुमच्या हाती यंदा दिवाळीमध्ये उटण्यासोबत कंदीलही पडणार आहेत कारण पक्षाचे लोगो असणाऱ्या कंदीलची ऑर्डर सध्या मोठ्या प्रमाणात कंदील बनवणाऱ्या दुकानांना दिली जात आहे.

सगळेच पक्ष आघाडीवर

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये फक्त सत्ताधारीच नाही तर विरोधी पक्ष देखील आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये तर शिवसेनेच्या बरोबरीनेच राष्ट्रवादी काँग्रेस देखील तेवढीच आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या नेत्यांनी मुंबईतल्या विविध भागांमध्ये मोठ्या संख्येने कंदील बनवण्याची ऑर्डर दिल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे. तर शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेसने देखील अशाच पद्धतीने कंदीलांच्या ऑर्डर दिल्याचे पहायला मिळत आहे. विशेष बाब म्हणजे छोट्या कंदीलांसोबत चौकाचौकात लागणाऱ्या मोठ्या कंदीलांवरदेखील यंदा पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांचा फोटो लावण्यावर भर देण्यात आल्याचे एका कंदील विक्रेत्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -

लालबागच्या ‘नानां’नीही साकारले राजकीय पक्षाचे कंदील

इको फ्रेंडली मकर बनवणाऱ्या नानासाहेब शेंडकर यांनी देखील यंदा पहिल्यांदा कागदी कंदील बनवले असून, त्यांनी देखील पक्षाची जाहीरात करण्यासाठी आपल्या कंदीलवर खास जागा सोडली असून, पक्षाच्या मागणीनुसार त्या त्या कंदीलवर त्या त्या पक्षाचे चिन्हा लावून देणार असल्याचे त्यांनी आपलं महानगरशी बोलताना सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेचाही खास कंदील तयार केला आहे.

महापौरांनी घेतले ४० कंदील

नानासाहेब शेंडकर यांच्याकडील कागदी कंदील आवडल्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी चक्क ४० कंदील घेतले आहेत. तर मुंबई महानगर पालिकेने पालिकेचा लोगो असलेले जवळपास १०० कंदीलांची ऑर्डर दिली असून, हे सर्व कंदील पालिकेमध्ये लावण्यात येणार आहेत.

- Advertisement -
पक्षांचे कंदिल

राजकारण्यांसोबत यांनीही मागवले ब्रँडिगसाठी कंदील 

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे स्वत:चे ब्रँडिंग करण्यामध्ये जसे राजकारणी पुढे आहेत तशीच सरकारी कार्यालये देखील पुढे असल्याचे पहायला मिळत आहे. एमएमआरडीएने १०० कंदील, मेरीबोर्डे – १००, एसबीआय, तसेच महापालिकेने देखील स्वत: च्या ब्रँडिंगसाठी कंदील मागवल्याचे नानासाहेब शेंडकर यांनी सांगितले.

राजकीय पक्षांना हे कंदील आवडले असून, अनेकांनी कंदिलांची मागणी केली आहे. तसेच पक्षाच्या ब्रँडिंगसाठी जागा ठेवण्यात आली असून, त्या जागेत पक्षाचे चिन्ह आणि नेत्याचा फोटो लावण्यात येणार आहे. काहींनी तर २ ते ५ हजारच्या घरात कंदीलची ऑर्डर दिल्याची माहिती नानासाहेब शेंडकर यांनी आपलं महानगरशी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -