ऑनलाईन बँकिंगद्वारे ३ कोटींची फसवणूक, भामट्याला अटक!

गोवंडीमध्ये पोलिसांनी एका फसवणूक प्रकरणाचा छडा लावला असून एका व्यावसायिकाला ३ कोटींना गंडा घालणाऱ्या प्रकरणात एकाला अटक केली आहे.

Mumbai
crime
प्रातिनिधीक फोटो

सुमारे तीन कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी शहानवाज अब्रार खान या भामट्याला शनिवारी सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचे इतर काही सहकारी फरार असून या टोळीने एका व्यावसायिकाच्या बँक खात्यातून दोन दिवसांत तीन कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यापैकी पावणेअकरा लाख रुपये शहानवाजच्या बँक खात्यात जमा केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांचे एका खाजगी बँकेत एक खाते आहे. जुलै महिन्यात इंटरनेटच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून ३ कोटी ३ लाख ५५ हजार रुपये इतर बँक खात्यात वळवले होते. हा संपूर्ण प्रकार ७ जुलै ते ९ जुलै २०१९ या कालावधीत झाला. १० जुलैला हा प्रकार तक्रारदार व्यावसायिकाच्या निदर्शनास आल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा तपास सायबर सेल पोलिसांकडे सोपवला.


हेही वाचा – बनावट फिंगर प्रिंटद्वारे आधार प्रणालीची फसवणूक

आरोपी गोवंडीचा रहिवासी

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत तपासाचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्सफर झाली होती, त्या बँकेच्या खातेदाराची माहिती काढण्यास सुरुवात केली. यावेळी शहानवाज खान याच्या खात्यात पावणेअकरा लाख रुपये जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले. या खातेदारांचा शोध सुरु असतानाच गोवंडी येथून शहानवाज खान याला पोलिसांनी अटक केली. तो गोवंडीतील शिवाजीनगर, ९० फीट रोड, २९/डी/१ मध्ये राहतो. चौकशीत त्याचा या गुन्ह्यात सहभाग उघडकीस आला. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून त्याच्या अटकेने इतर काही आरोपींची नावं समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.