सोशल मीडियावरची मैत्री तरुणीला भोवली; भामट्यानं मागितले अश्लील व्हिडिओ!

सोशल मीडियावर एका तरुणाशी केलेल्या मैत्रीमुळे मुलुंडमधली एक तरुणी चांगलीच अडचणीत सापडली. प्रकरण इतकं टोकाला गेलं की तिला थेट पोलीस स्टेशनच गाठावं लागलं.

Mumbai
mumbai molestation
महिलेला त्रास देणाऱ्याला अटक

सोशल मीडियावरची मैत्री मुलुंडमध्ये राहाणाऱ्या एका ३० तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. एका तरुणाशी झालेल्या मैत्रीनंतर याच तरुणाने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. शिवाय बदनामीची धमकीही द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अखेर मनस्ताप सहन न झाल्यामुळे या तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी त्रिंबक गिरी या ३८ वर्षांच्या भामट्याला दापोलीतून अटक केली असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियावरच्या धोक्याबद्दल अधिक सतर्क राहण्याची गरजच अधोरेखित झाली आहे.

…आणि त्यानं मागितले अश्लील व्हिडिओ!

तक्रारदार तरुणी ३० वर्षांची असून मुलुंडच्या नवघर परिसरात वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वीच तिची त्रिंबक गिरीशी सोशल मिडीयाद्वारे ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले. ते दोघेही व्हॉटअपसह इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. याच दरम्यान त्याने तिला प्रपोज केले. तिनेही त्याला होकार दिला. पण त्यानंतर त्याने तिला काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवले. या व्हिडिओप्रमाणे त्याने तिला तिचे स्वत:चे व्हिडिओ बनवून पाठवायला सांगितलं. तिनं तसं न केल्यास तिच्यावर बलात्कार करून बदनामी करण्याची धमकीही दिली. या धमकीनंतर तिने त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. तरीही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा पाठलाग करतच होता.


हेही वाचा – दोन शाळकरी मुलींचा विनयभंग आणि अत्याचार

मनस्ताप सहन न झाल्यानं अखेर तिनं निर्णय घेतला!

बदनामीच्या भीतीने सुरुवातीला तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र पुढे मनस्ताप जास्तच वाढू लागल्यानंतर तिने नवघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे पोलिसांना हा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी त्रिंबक गिरीविरुद्ध ३५४ (ड), ५०४, ५०६, ५०९ भादंवी सहकलम ६७ आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच नवघर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याचे सीडीआर काढून लोकेशनची माहिती काढली. तपासात तो उरण येथील दापोलीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनंतर या पथकाने उरण येथून त्रिंबक गिरी याला अटक केली.

भामटा निघाला कॅण्टीनचा अकाउंटंट

पोलीस तपासात त्रिंबक हा याच परिसरातील एका कॅण्टीनमध्ये अकाऊंटंट म्हणून कामाला असल्याचं स्पष्ट झालं. तो मूळचा लातूरचा रहिवाशी आहे. या भामट्याची पोलीस कोठडीत रवानही करण्यात आली असून तिथे पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याचा मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.