योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी देणारा लपला होता मुंबईत!

Mumbai
Uttar Pradesh CM Yogi Adityanath talks on Rammandir issue
फाईल फोटो

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. फोनवर ही धमकी देण्यात आली होती. योगी आदित्यनाथ यांना थेट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन अधिक सतर्क झालं होतं. या धमकीनंतर त्यासंदर्भात लागलीच तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. अखेर ती धमकी देणाऱ्याचा माग पोलिसांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या सहाय्याने काढला असून तो मुंबईतच लपून बसल्याचं उघड झालं. त्यानंतर त्याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. एवघ्या दोन दिवसांमध्ये मुंबई एटीएसने या भामट्याचा शोध लावल्यामुळे मुंबई एटीएसचं देखील कौतुक केलं जात आहे.

कामरान अमीन खान असं या अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. लखनऊच्या गोमती नगर पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर काल म्हणजेच शुक्रवारी यासंदर्भात महाराष्ट्र एटीएसला देखील माहिती देण्यात आली. या प्रकरणातला संशयित मुंबईत लपला असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. त्यानुसार महाराष्ट्र एटीएसने मुंबई एटीएसच्या मदतीने या प्रकरणात शोध सुरू केला. आज रात्री उशिरा कामरान अमीन खानला मुंबईतून अटक केली. त्याला उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या ताब्यात देण्यात आलं असून उद्या त्याला मुंबईतल्या कोर्टात दाखल केलं जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here