घरमुंबईमहापालिकेच्या जागेवर कचर्‍याचे ढीग

महापालिकेच्या जागेवर कचर्‍याचे ढीग

Subscribe

प्रदुषण, दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न

भाईंदर पूर्वेच्या आझाद नगर भागातील खेळाचे मैदान व सामाजिक वनीकरणाच्या जागेतील अतिक्रमण तसेच मूळ आरक्षण विकसित न करताच लोकप्रतिनिधी आणि महापालिकेने शिल्लक मोकळ्या भूखंडांची दोन सांस्कृतिक भवनाच्या आड चालवलेली लचकेतोड वादात सापडली आहे. त्यातच येथील महापालिका आरक्षणाच्या जागेत कचरा वेचक व भंगारवाल्यांनी गोदामे थाटली असून घातक कचरा सर्रास जाळला जात असल्याने परिसरातील नागरिक या धुराच्या विळख्यात सापडले आहेत.

शहराच्या मध्यभागी असलेले सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानाचे आरक्षण हे आजुबाजूच्या काही हजार रहिवाशांच्या हक्काचे व गरजेचे आहे. या आरक्षणाच्या जागेसाठी महापालिकेने करोडो रुपयांचा टिडीआर बिल्डरांना दिला आहे. काही प्रकरणात तर जागेवर अतिक्रमण असून देखील टिडीआर दिला गेल्याच्या तक्रारी आहेत. या भागात आझाद नगरसह गोल्डन नेस्ट, न्यु गोल्डन नेस्ट, निरा कॉम्पलेक्स, सायलेंट पार्क इंद्रलोक, सर्वोदय कॉम्पलॅक्स आदी परिसरातील हजारो रहिवाशांसाठी खेळाच्या मैदानाचे हे एकमेव आरक्षण आहे. तसेच या भागात असणारे केमिकल व अन्य औद्योगिक कारखाने तसेच शहराच्या मध्यभागी असल्याने वाहनांच्या प्रचंड प्रदूषणाची वस्तुस्थिती पाहता येथील सामाजिक वनीकरणाच्या आरक्षणाचा विकास करणे लोकांच्या आरोग्यासाठी तसेच पर्यावरणाच्या समतोलासाठी गरजेचे बनले आहे. महत्त्वाचे म्हणजे सामाजिक वनीकरणाचे विकास आराखड्यातील एकमेव आरक्षण आहे.

- Advertisement -

सामान्य नागरिकांना खेळासह प्रदूषण मुक्त आरोग्यासाठी सामाजिक वनीकरण व खेळाच्या मैदानाची आवश्यकता असताना देखील महापालिका, लोकप्रतिनिधी व शासनाने संगनमताने या आरक्षणाचे लचकेतोड चालवली आहे. मूळ दोन्ही आरक्षणे विकसीत न करताच मोकळ्या जागा चक्क दोन सांस्कृतिक भवनासाठी राजकीय फायद्यासाठी वळवल्या आहेत. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक आदींनी तक्रारी चालवल्या असून महापालिका आयुक्तांसह संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

दुसरीकडे महापालिकेच्या मालकीच्या जागेवर बेकायदा बांधकामांपासून कचरावेचक आणि भंगारवाल्यांची अतिक्रमणे झाली आहेत. या भंगारवाले व कचरावेचकांनी आपली गोदामे येथे थाटली असून त्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. त्यांच्याकडून दिवसा तसेच रात्री प्लास्टिक, वायर आदी घातक वस्तूंना आगी लावण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. धुराचे लोट इतके मोठे असतात की, आजुबाजूच्या लोकांना घरात राहणे मुश्कील होते. या घातक धुरामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही वेळेला तर अग्निशमन दलाला येथे लागलेल्या मोठ्या आगींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. धुरामुळे लहान मुलांसह मोठ्यांना श्वसनाचे आणि अन्य विकारांचा त्रास होत आहे.

- Advertisement -

येथे महापालिकेच्याच कचरा वाहून नेणार्‍या गाड्यादेखील कचरा आणून टाकत आहेत. शासन उघड्यावर शौचमुक्त राज्य झाल्याचा दावा करत असले तरी याठिकाणी मात्र रोज सकाळी रात्री उघड्यावरच शौच उरकले जात आहे.

ही महापालिकेच्या मालकीची जागा असून देखील पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी मात्र याठिकाणी सुरक्षा ठेवण्यास, अतिक्रमण हटवण्यास तसेच स्वच्छता ठेवण्यास कमालीची टाळाटाळ करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. याबाबत आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी करू. पाहणी वेळी जी स्थिती असेल त्याचा अहवाल तयार करून आवश्यक त्या विभागनिहाय कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -