घरमुंबईपीएमसी बँक घोटाळा : निलंबित संचालक जॉय थॉमस यांना अटक

पीएमसी बँक घोटाळा : निलंबित संचालक जॉय थॉमस यांना अटक

Subscribe

पंजाब अ‍ँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) ४ हजार ३५५ कोटी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी गुरुवारी अटक केलेल्या एचडीआयएलचे अध्यक्ष राकेशकुमार कुलदिपसिंग वाधवान आणि महाव्यवस्थापकीय संचालक सारंग राकेशकुमार वाधवान या पिता-पुत्रांना शुक्रवारी लोकल कोर्टाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत शुक्रवारी बँकेचे निलंबित व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जॉय यांना शनिवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. आतापर्यंत पोलिसांनी एचडीआयएल कंपनीसह इतरांचे ४४ बँक खात्याची माहिती काढली असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसून आले आहे.

एमपीसी बँकेने २००८ ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत एचडीआयएल कंपनीला कोट्यचधी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. भांडुपच्या पीएमसी बँकेतून या कर्जाचे वाटप केल्यानंतर या कंपनीसह त्यांच्या सलग्न कंपनीचे कर्जाची परतफेड झाली नव्हती. या बँकेतील ठराविक कंपन्यांची मोठी कर्ज खाती ज्यामध्ये कर्ज परतफेड होत नसल्याने अनुत्पादक कर्ज (एनपीए) झाली होती. असे असतानाही त्यांना अनुत्पादक कर्ज घोषित करण्यात आले नव्हते. तसेच ही माहिती जाणूनपूर्वक रिझर्व्ह बँकेपासून लपविण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात बँकेला ४ हजार ३५५ कोटी ४६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. या गैरव्यवहार संबंधित कंपनीने बँकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरुन केला होता, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत गुरुवारी एचडीआयएलचे अध्यक्ष राकेशन वाधवान आणि महाव्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवन यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते. दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर या पिता-पूत्रांना सायंकाळी पेालिसांनी अटक केली होती. शुक्रवारी दुपारी त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने या दोघांनाही ९ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण घोटाळ्यात बँकेचे माजी महाव्यवस्थापक जॉय थॉमस यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यांनीच या कंपनीला कोट्यवधी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. त्यामुळे त्यांना शुक्रवारी पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले होते, चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. जॉय यांना शनिवारी कोर्टात हजर केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -