घरमुंबईदोन हजार रुपयांची बनावट नोट विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक

दोन हजार रुपयांची बनावट नोट विक्रीसाठी आणणाऱ्याला अटक

Subscribe

सणासुदीच्या दिवसात मुंबईच्या बाजारपेठेत भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन आलेल्या एका तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

मुंबई – पाकिस्तानातून बांगलादेश मार्गे भारतात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा पुरवठा करण्यात येत असून पश्चिम बंगालमधील दुर्गम ठिकाणांवरून या नोटा भारतातील मुख्य बाजारपेठेत आणण्यात येत आहेत. सणासुदीच्या दिवसात मुंबईच्या बाजारपेठेत भारतीय चलनातील बनावट नोटा घेऊन आलेल्या एका तरुणाला २ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पश्चिम बंगालचा आरोपी मुंबईत 

डोबीरुल अरफान शेख (वय-२४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मूळचा पश्चिम बंगाल राज्यात राहणार हा तरुण काही दिवसांपूर्वी मुंबईत आला होता. जोगेश्वरी या ठिकाणी एका बांधकामाच्या ठिकाणी आपल्या काही नातेवाईकांसोबत तो राहात होता. एक इसम बुधवारी सायंकाळी भारतीय चलनातील बनावट नोटांसह ना. म. जोशी मार्ग (डिलाईल रोड) या ठिकाणी असलेल्या आस्वाद हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंभे यांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त नेताजी भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली निकुंभे यांनी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ उघडे, गजानन भारती, पोलीस हवालदार गोरेगावकर, विनायक जाधव, वैभव बीडवे या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून डोबीरुल अरफान शेख या तरुणाला ताब्यात घेऊन त्याला चौकशीसाठी गुन्हे शाखेत आणले. त्या ठिकाणी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळून पोलिसांनी भारतीय चलनातील दोन हजार रुपयांच्या १२ नोटा सापडल्या.

- Advertisement -

नोटांच्या मागे कमिशनची खुण 

पोलिसांनी नोटा तपासल्या असता त्या बनावट स्वरूपाच्या असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने या नोटा पश्चिम बंगाल येथून आणल्या असल्याचे पोलिसांना सांगितले. प्रत्येक २००० च्या नोटेमागे ५० टक्के कमिशनवर या नोटा भारतात आणल्या जात असल्याची माहिती त्या तरुणाने पोलिसांना दिली. दिवाळीचा सण मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे येथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे या ठिकाणी बनावट नोटा चालवण्यात अडचण येणार नसल्याने मुंबईत घेऊन आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या तरुणाने पोलिसांना दिली. भारतीय चलनातील नवीन नोटेसह हा तरुण प्रथमच मुंबईत आला होता आणि बनावट नोटा बाजारात चालवण्यापूर्वीच तो पोलिसांच्या हाती लागला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २०१५ मध्ये बनावट नोटांसह या तरुणाला मुंबईतील पश्चिम उनगरात अटक करण्यात आली होती. तसेच त्याचे आणखी काही साथीदार मुंबईत असावे, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -