घरमुंबई३५+ बंद घरांना लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक

३५+ बंद घरांना लुटणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक

Subscribe

घरफोडीच्या गुन्ह्यांतील दोन सराईत गुन्हेगारांना बुधवारी गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आसिफ अकबर खान आणि कासिफ असे या दोघांचे नाव असून त्यांच्या अटकेने ३५ हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोघांकडून पोलिसांनी कारसह २१ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. दिवाळीच्या कालावधीत सुट्टीसाठी फ्लॅट बंद करुन गावी आणि बाहेरगावी फिरायला गेलेल्या फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. अशा गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

दरम्यान घरफोडीच्या गुन्ह्यांतील काही सराईत गुन्हेगार वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई वारंगे आणि राऊत यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील आशा कोरके, इरफान शेख, शरद थराडे, वाल्मिक कोरे, विजेंद्र आंबवळे, शिर्के, राऊत, वारंगे, नाईक, वानखेडे, महांगडे, पवार, परब, निकम यांनी वांद्रे येथील कुरेशी नगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे एका सिल्व्हर रंगाच्या कारमधून आसिफ आणि कासिफ हे दोघेही आले होते. या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता त्यात पोलिसांना २१ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, अमेरिकन डॉलर, टिव्ही, कुलर, मोबाईल, केशरचनेचे साहित्य आणि काही कागदपत्रे सापडली.

- Advertisement -

या मुद्देमालाविषयी विचारणा केल्यानंतर ते दोघेही घरफोडीच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध वांद्रे, माहीम, निर्मलनगर, पायधुनी, वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात ३५ हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांतील जप्त मुद्देमाल असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. त्यानंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी वांद्रे पोलिसांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -