भांडणात मध्यस्ती करणाऱ्यालाच पोलिसांनी केली मारहाण

माघी गणपती उत्सवादरम्यान झालेल्या मारहाणीत मध्यस्ती करणाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला ही मारहाण करण्यात आली आहे.

Navi Mumbai
police beat
प्रातिनिधिक फोटो

भांडणांमध्ये मध्यस्थी करुन ती सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला इसमाला कळवा पोलीसांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी बेदम मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. मारहाण करण्यात आलेला इसम हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे. या प्रकरणी पीडित इसमाने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केली आहे.

कसा घडला हा प्रकार

केसरीनाथ आर्यमाने असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, माघी गणेशोत्सवाचे विसर्जन करण्यासाठी केसरीनाथ आपल्या कुटुंबियांसोबत कळवा खाडी येथे चालले होते. त्यावेळी कळवा मेडीकल येथे आतीश पाटील, देवनाथ पाटील आणि जगदीश केणी यांच्यासोबत पोलीस निरीक्षक बागडे यांचे वाद्य बंद करण्यावरुन वाद सुरु असल्याने विसर्जन मार्गात वाहतूक कोंडी झाली होती. ही बाब आर्यमाने यांनी बागडे यांच्या निदर्शनास आणून वाद न घालता रस्ता मोकळा करुन देण्याची विनंती केली. तसेच, या वादावादीमध्ये मध्यस्थी करुन हे वाद मिटवले. त्यावर बागडे यांनी आर्यमाने यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर आपण विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांचे नातेवाईक असल्याचे सांगितले असता, बागडे यांनी अधिकच प्रमाणात त्यांना शिव्या दिल्या. मात्र, उपस्थित लोकांनी मध्यस्थी करण्यास सुरुवात केल्याने बागडे यांनी, तुला बघून घेतो, असा दम देऊन माघार घेतली.

धनजंय मुंडे यांनी केले ट्विट

११ फेब्रुवारी रोजी आर्यमाने यांना फोन करुन पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आर्यमाने हे पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस निरीक्षक बागडे यांनी आर्यमाने यांना बेदम मारहाण केली. आर्यमाने यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झालेली असल्याने या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला जबर जखम झाली आहे. तसेच, या नंतर कोऱ्या कागदावर आर्यमाने यांच्या सह्या घेऊन त्यांना पिटाळून लावण्यात आले, असे आर्यमाने यांनी आपल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी आर्यमाने यांनी मुख्यमंत्र्यांशीही पत्रव्यवहार केला आहे. तर, धनजंय मुंडे यांनी ट्वीट करुन या प्रकरणाचा निषेध केला आहे.