घरमुंबईनिवडणूक काळात पैसे, दारू वाटपावर पोलिसांची नजर

निवडणूक काळात पैसे, दारू वाटपावर पोलिसांची नजर

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे आणि दारूचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. यासाठी पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आचारसंहितेबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होते.

निवडणूक काळात मतदारांना वाटण्यासाठी राजकीय पक्षाकडून पैसे दिले जातात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात केली असून, याद्वारे कार, दुचाकीची तपासणी करण्यात येणार आहे. वाहनांमध्ये बेहिशोबी पैसे सापडले, तर जिल्हा प्रशासनाकडून बनविण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती याची चौकशी करेल, असेही जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले.

- Advertisement -

निवडणुक काळात अनेक ठिकाणी मतदारांना दारूचे वाटप करण्यात येते. यासाठी उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिल्या असून, जिल्ह्यातील वाईन शॉप, बार यावर दारू विक्री वाढल्यास त्याची शहानिशा करण्यात येईल. त्यात दोषी आढळल्यास त्यांचे परवाने जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दारू बनविणार्‍या कंपनीवरही लक्ष देण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. वाईन शॉप व बार यांनी चालू व बंद करण्याची वेळ पाळायची आहे. अन्यथा याबाबत कसूर केल्यास लायसन्स जप्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -