घरमुंबईऐन दिवाळीत पोलीस कुटुंबाचा संसार जळाला

ऐन दिवाळीत पोलीस कुटुंबाचा संसार जळाला

Subscribe

ठाण्याच्या पीडब्लूडीचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर

दिवाळी तोंडावर असतानाच ठाण्यातील पोलीस कुटूंबाच्या घराला अचानक आग लागली आणि त्या आगीत त्यांचा संपूर्ण संसारच जळून खाक झाला. पै- पै जमवून बनवलेले ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि घरातील सर्व सामान बेचिराख झाले. केवळ अंगावरील कपडेच उरले. सगळं गेलं, पण लाखमोलाचा जीव वाचला. एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे ठाण्यातील पोलीस कर्मचारी प्रसाद पवार यांचे कुटूंब उघडयावर पडले होते. त्यांना शेजारच्या इमारतीत आसरा मिळाला. पण या घटनेला १६ दिवस उलटले तरी अजूनही पवार कुटूंबियांना एक कवडीचीही मदत मिळालेली नाही. शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी शासकीय घरातील डागडुजी, विजेचे मेन्टेनन्स वेळेवर केले जात नसल्याचा मुद्दाही यानिमित्ताने समोर आलाय. त्यामुळे ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा ( पीडब्लूडी) भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आलाय.

ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या मागील बाजूस शासकीय वसाहती आहेत, या वसाहतीत ४ इमारती आणि ५ ते ६ चाळी आहेत. यामध्ये कारागृहातील अधिकारी व पोलीस कर्मचारी राहतात. ३० ऑक्टोबरला मध्यरात्री १२ च्या सुमारास पोलीस कर्मचारी प्रसाद पाटील यांच्या घराला अचानक आग लागली. यावेळी पाटील हे रात्रपाळीला डयुटीवर होते. त्यामुळे घरात आई, पत्नी आणि अडीच वर्षांची त्यांची मुलगी तिघेजण झोपले होते. किचनच्या मागील बाजूस आग लागली होती. मात्र आगीचा तडतड आवाज झाल्याने त्यांच्या आईला जाग आली. सुरूवातील त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र आवाज आणखीनच वाढल्याने त्यांनी दरवाजातून वाकून पाहिले, त्यावेळी त्यांना आग लागल्याचे दिसले. त्यांनी त्वरीत सून आणि नातीला उठवले. प्रसाद हे रात्रपाळीला असल्याने त्यांना फोन केला. घराबाहेर येऊन त्यांनी शेजार्‍यांना उठवले.

- Advertisement -

अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील वॉशिंग मशीन, फ्रीज, तीन तोळे सोने घरातील सर्व भांडी सामान जळून खाक झाले. ऐन दिवाळीत पाटील कुटुंबियांवर हा प्रसंग ओढवल्याने सर्वच पोलीस कर्मचार्‍यांमध्ये हळहळ व्यक्त होतेय. पाटील यांना शेजारच्या इमारतीत रूम देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारीही पंधरा दिवसानंतर त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले. मात्र वीज विभागाला आग लागल्याची माहिती सुध्दा नाही. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे पाटील कुटुंबियांना सावरण्यासाठी शासनाने मदत मिळावी अशी सर्वच पोलीस कर्मचार्‍यांची अपेक्षा आहे.

ज्यावेळी आग लागली त्यावेळी मी रात्रपाळीत कामाला होतो. घरात आई, पत्नी व लहान मुलगी होती, घरातील तीन तोळे सोने व इतर सर्व सामान जळून गेलं. पण देवाचे खूप आभार मानतो, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. अजूनही कोणतीच मदत मिळालेली नाही. (प्रसाद पाटील,पोलीस कर्मचारी)

- Advertisement -

दहा ते पंधरा वर्षांनी वायरिंग बदलायला हवी. काही दिवसांपूर्वीच जेल परिसरातील पूजा आणि सेवा या इमारतीची वायरिंग आणि मीटर नवीन लावण्यात आले आहेत. अजून १२ रूमचे एस्टीमेंट तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे मेन्टनसची कामे होत असतात. काही वेळेला वीज विभागाकडून करण्यात येणार्‍या वायरिंगमध्ये छेडछाड केली जाते. त्यावर एसी वापरली जाते. वीजपुरवठयावर लोड येऊन शॉर्टसर्किटचे प्रकार होत असतात. जेल वसाहतीच्या घराला लागलेल्या आगीविषयी विद्युत विभागाला कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सदर ठिकाणी जाऊन त्वरित पाहणी करण्यात येईल. (स.ल.अवसारे सहायक अभियंता, श्रेणी २ पीडब्लूडी ठाणे)

वीज विभागात मेन्टेनन्ससाठी कर्मचारीच नाहीत

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाच्या अख्यातरित पालघर ते सिंधुदूर्ग पर्यंतचा परिसर येतो. ठाणे, कल्याण, पेण, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग असे पाच उपविभाग आहेत. प्रत्येक ठिकाणी उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या जागा रिक्त आहेत. ठाणे विभागात ७० ते ८० शासकीय इमारती आहेत. कोपरी १२ बंगला येथे व्हीआयपी अधिकार्‍यांचे बंगले आहेत. मात्र ठाण्यासाठी अवघे ३ वायरमन आहेत. २ उपअभियंता आणि ३ कनिष्ठ अभियंते यांच्या जागा रिक्त आहेत. सेवानिवृत्तीनंतर अनेक जागा भरल्या गेलेल्या नाहीत. त्यामुळे अपुर्‍या कर्मचार्‍यां अभावी मेन्टनन्सच्या कामांना वेळ लागत असल्याचे विद्युत विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

बांधकाम विभागात मेन्टनन्ससाठी निधीच नाही …

सध्या शासनाकडून बिल्डींग रिपेअरींगसाठी निधीच मिळत नाही. कंत्राटदारांची ६० ते ७० कोटींची बिलेही थकलेली आहेत. त्यामुळे सध्या रस्त्यांची कामे सुरू असून ती कामे कामे पूर्ण केली जात आहेत. मेन्टनन्सचे अतिमहत्वाच्या काम असल्यास त्याचे एस्टीमेंट बनवून पाठवले जातात. निधीच मिळत नसल्याने मेन्टेनन्स होत नाही ही वस्तुस्थिती असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने मान्य केले. मात्र जेल वसाहतीतील प्रकाराविषयी एस्टीमेंट बनविण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -