घरमुंबईठामपा कर्मचार्‍यांच्या मागावर पोलीस

ठामपा कर्मचार्‍यांच्या मागावर पोलीस

Subscribe

निवडणुकीच्या कामावर गैरहजरी

या वर्षात लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू असून जिल्हाधिकारी कार्यलयामार्फत निवडणुकीची कामे वाटून दिली जात आहेत. सुमारे 60 हजार कर्मचारी या कामाकरता उपलब्ध करण्यात आले आहेत. ज्यामध्ये शाळा, कॉलेजेस, विविध महानगरपालिका मधील कर्मचार्‍यांचा भरणा आहे. यामध्ये ठाणे महानगर पालिकेच्या विविध आस्थापनामधील कर्मचार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र मागील महिन्याभरापासून या कर्मचार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाकडे पाठ फिरवली असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊन अद्यापही हे कर्मचारी निवडणुकीच्या कामावर हजर झाले नसल्याने अखेर त्यांच्या मागावर पोलीस पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून मिळत आहे.

- Advertisement -

ठाणे जिल्हाक्षेत्र मोठे आहे. या जिह्यातून 3 खासदार तर 18 आमदार निवडून दिले जातात. भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघांचा समावेश या जिह्यात होतो. एवढ्या मोठ्या कामाकरता जास्तीत जास्त कर्मचारी नियुक्त करणे हे जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षेत येते. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्येक आस्थापनातून कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांनी ते काम वेळेत आणि चोख करणे बंधनकारक असते. हे काम साधारण महिनाभराचे असून 5 वर्षातून एकदा हे काम त्यांना करावे लागते. मात्र ठामपाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या असहकारामुळे जिल्हाधिकारी यांनी त्यांना थेट नोटीस बजावली आहे. याआधीही त्यांना पत्राद्वारे समज देण्यात आली होती. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आता या कर्मचार्‍यांना तात्काळ निवडणुकीच्या कामावर हजर करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात आली आहे. ठाण्यातील पोलीस स्टेशनला पत्राद्वारे गैरहजर आणि कामचुकार अधिकार्‍यांची नावे देण्यात आली आहेत. त्यांना लवकरात लवकर कामावर हजर करा, असे आदेशही देण्यात आले आहेत.

आचारसंहिता सुरू झाल्यानंतर सर्वच संबंधित कर्मचारी वर्गास निवडणुकीच्या काम करणे बंधनकारक आहे. यामध्ये माझ्यासहीत सर्वच अधिकारी येतात. आणि निवडणुकीचे काम हे सरकारी काम आहे. ते सर्वांनी करणे आवश्यक आहे. त्यात कोणी हयगय करीत असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे.
– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा

- Advertisement -

ज्या कामात मलिदा नाही त्या कामांकडे वळायचे नाही अशा ठामपा कर्मचार्‍यांचा पायंडा असल्याने ते याकडे अद्यापही वळले नाहीत. साइट व्हिजिटच्या नावाखाली दिवसभर बाहेर असणार्‍या कर्मचार्‍यांना निवडणुकांसारख्या राष्ट्रीय कामासाठी मात्र वेळ नाही. एवढे मोठे काम सोडून ते कोणत्या कामात व्यग्र होते. याचीही चौकशी झाली पाहिजे.
-संजीव दत्ता, सामाजिक कार्यकर्ते, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -