कुलाब्यातल्या ‘प्लॅटिनियम बार’वर धाड; बडे अधिकारी सापडल्याची चर्चा!

Mumbai
raid on Golden Guess Bar From the officers of the Anti Narcotics Cell
प्रातिनिधीक फोटो

काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील एका बारवर झालेल्या कारवाईनंतर गावदेवी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांवर थेट निलंबनाची करण्यात आली होती. याचाच धसका मुंबईतील इतर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी घेतला आहे. आपल्यावर अशा प्रकारची कारवाई होऊ नये, म्हणून मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी स्वतः आपल्या हद्दीत सुरु असणारे अवैध धंदे तसेच बारकडे जातीने लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. कुलाबा पोलिसांनी नुकतीच एका बारवर कारवाई केली असून त्या बारमध्ये सरकारी विभागाचे काही अधिकारी तसेच खाजगी व्यक्ती आढळून आल्याची चर्चा बुधवारी दिवसभर समाजमाध्यमांवर सुरू होती. बारवरील कारवाईत महानगरपालिकेच्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह एका आमदाराचा खासगी सचिव, एका न्यायाधीशाचे पती आणि काही मनपाचे अधिकारी अशा एकूण १५ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. मात्र पोलिसांनी अधिकारी सापडल्याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र कुलाब्यातील बारवर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – डान्स बारवरील छाप्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

कशी झाली कारवाई?

दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील हॉटेल ताजजवळ असणाऱ्या ‘प्लॅटिनियम बार’ या ठिकाणी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तालय विशेष पथकाने मंगळवारी रात्री उशिरा कारवाई केली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बारवर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या कारवाईमागचे गुपित मात्र वेगळेच असल्याची चर्चा पोलीस आणि इतर सरकारी विभागांत बुधवारी दिवसभर रंगली होती. ‘प्लॅटिनियम बार’वर कऱण्यात आलेल्या कारवाईत बारमध्ये काही बडे सरकारी अधिकारी, आमदारांचे स्वीय सचिव, न्यायाधीशांचे पती आणि इतर अधिकारी सापडल्याची चर्चा सुरु होती. पोलिसांच्या एका खबऱ्याकडूनच हा कारवाईचा संदेश समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

कुणी केली सोशल मीडियावर पोस्ट?

या व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी अनेक पत्रकारांनी मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी संपर्क साधला असता या अधिकाऱ्यांकडून बारवर नेहमीप्रमाणे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तरी किती जणांवर कारवाई झाली? त्यात कुणाचा समावेश होता? याच्यावर बोलणे टाळले आहे. मुंबईत इतरवेळी होणाऱ्या बारवरील कारवाईची इत्थंभूत माहिती पत्रकारांना कळवण्यात येते. मात्र कुलाबा येथील ‘प्लॅटिनियम बार’ वर झालेल्या कारवाईबात पोलिसांनी शेवटपर्यंत चुप्पी साधल्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे.