रायगडात राजकीय घडामोडींना वेग

Mumbai
Sunil Tatkare

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. इतर पक्षातील नाराजांच्या भेटीगाटी घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने राजकीय वातावरण तापू लागले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँगेेसने रायगडचे माजी पालकमंत्री सुनील तटकरे यांना उमदेवारी दिली आहे. सुनील तटकरे यांनी आपला प्रचार सुरू केला असून अनंत गीते यांनी अजून आपला प्रचाराचा नारळ फोडलेला नाही. शिवसेनेची यंत्रणादेखील तशी कामाला लागलेली नाही. या दोन्ही नेत्यांनी विरोधी पक्षातील नाराजांना आपल्याकडे वळविण्यावर भर दिला आहे. अलिबागचे काँगेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर हे सुनील तटकरे यांच्यावर नाराज आहेत. हे माहीत असल्यामुळे गीते यांनी काही दिवसांपूर्वी मधुकर ठाकूर यांच्या सातिर्जे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. परंतु धुळवडीच्या दिवशी तटकरे यांनी ठाकूर यांची अलिबाग येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन लोकसभा निवडणुकीत सहकार्य करण्याची विनंती केली.

गीते यांनी देखील तटकरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांची भेट घेतली असून नाविद अंतुले शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बॅ. अंतुले यांना मानणारा एक मोठा वर्ग रायगड जिल्ह्यात आहे. नाविद शिवसेनेत आल्यास बॅ. अंतुले यांना मानणारा वर्ग आपल्याला मदत करील असे गीते यांना वाटतेे.

शिवसेनेतील काही नाराज नेते मंडळी आहेत. त्यांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न तटकरे करीत आहेत. शेकापचे रायगड जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्यामार्फत या नाराज शिवसैनिकांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रायगड जिल्ह्यात बर्‍याच काही राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. त्यापूर्वी गाठीभेटी घेतल्या जात आहेत. त्यामुळे हळूहळू रायगडातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.शिवसेनेचे उमेदवार केद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते 28 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here