पोलीस शिपायाकडून महिलेवर अत्याचार

Mumbai
arrest
प्रातिनिधिक फोटो

पवईतील डी मार्टमध्ये चॉकलेट चोरी केल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका विवाहित महिलेवर एका पोलीस शिपायानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंद होताच आरोपी पोलीस शिपाई मधुकर कचरु आव्हाड (48) याला पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक कोर्टाने 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मधुकर हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्याच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई होणार आहे. पिडीत महिलेची वैद्यकीय चाचणी झाली असून लवकरच आरोपी पोलीस शिपायाची मेडीकल होईल, असे तपास अधिकार्‍याने सांगितले.

तक्रारदार महिला ही भांडुप येथील एका विमा कंपनीत कामाला आहे. 6 फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता त्या कामावरुन पवईतील डी मार्ट येथे खरेदीसाठी आली होती. यावेळी त्यांनी डी मार्ट येथून दहा चॉकलेटची पाकिटे चोरी केली होती. ते चॉकलेट तिने तिच्या पर्समध्ये लपवून ठेवले होते. सामानाचे बिल करुन बाहेर जात असताना तेथील महिला सिक्युरिटी गार्डने त्यांच्याकडील बिल आणि खरेदी केलेले सर्व सामान तपासले. बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यांच्याकडे दहा चॉकलेटची पाकिटे सापडली. त्यानंतर तिला एचआर रुममध्ये नेण्यात आले. तेथे तिने चूक कबुल करुन चॉकलेटचे पैसे भरते असे सांगितले. तसेच पोलीस आल्यानंतर तिने आपण पुन्हा चोरी करणार नाही, असे लिहून दिले. या माफीनामामध्ये तिचे नाव, राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच आधार कार्डची प्रत आदीची माहिती होती. दुसर्‍या दिवशी त्यांना मधुकर आव्हाड यांनी तीन वेळा कॉल केला होता, मात्र त्यांनी घाबरुन ते कॉल घेतले नाही. त्यानंतर दुपारी पुन्हा कॉल आल्यानंतर तिने तो कॉल घेतला, यावेळी मधुकर आव्हाड यांनी तिला दमदाटी करण्यास सुरुवात करुन भेटण्यासाठी बोलाविले, मात्र तिने कामात व्यस्त असल्याने आपण उद्या भेटू असे सांगितलेे.

शुक्रवारी सकाळी त्या त्यांच्या भांडुप येथील आईच्या घरी गेल्या होत्या. यावेळी मधुकर आव्हाड यांनी पुन्हा फोन करुन प्रकरण मिटविण्यासाठी त्यांना पवईतील एलएनटी गेटजवळ बोलाविले. दुपारी दिड वाजता त्यांची भेट झाली. त्यानंतर ते दोघेही त्याच्या बाईकवरुन आरे रोडवरील एका हॉटेलमध्ये आले. याच हॉटेलमधील एका रुममध्ये त्याने तिच्यावर जबदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच पुन्हा बोलाविले तर तिला यावे लागेल, नाहीतर तिच्यावर कारवाईची धमकी दिली. तिने त्यास होकार दिल्यानंतर मधुकर आव्हाडने तिला बाईकवरुन पवईतील आंबेडकर गार्डन परिसरात सोडून दिले. त्यानंतर तो तेथून निघून गेला होता. घरी गेल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. ही माहिती ऐकून त्याला धक्काच बसला. त्यानंतर ते दोघेही पवई पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मधुकर आव्हाड याच्याविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी मधुकरविरुद्ध बलात्कारासह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

गुन्हा दाखल होताच शनिवारी रात्री त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पिडीत महिलेवर बलात्कार करुन तिला धमकी दिल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला याच गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. पोलीस तपासात मधुकर आव्हाड हा अंधेरीतील म्हाडा कॉलनीतील पोलीस वसाहतीत राहत असून पोलीस नाईक म्हणून सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याने त्याचा पदाचा गैरवापर केल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्याच्याविरुद्ध लवकरच निलंबनाची कारवाई होणार आहे. त्याची लवकरच पोलिसांकडून मेडीकल होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here