घरमुंबईआता रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या टाक्या प्रदूषित

आता रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या टाक्या प्रदूषित

Subscribe

मरीन लाईन रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार , पाण्याच्या टाकीवर गर्दुल्ल्यांचा ताबा

नुकतेच कुर्ला रेल्वे स्थानकावर खाणेरड्या पाण्यात लिंबू सरबत बनविणार्‍या विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. आता चक्क पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर घाणीचे साम्राज्य जमले असून, गर्दुले याच टाकीतून पाणी काढून त्याचा वापर करत असतात, अशी धक्कादायक माहिती दैनिक ‘आपलं महानगर’च्या हाती लागली आहे. त्यामुळे आता रेल्वे स्थानकांवरील पिण्याचे पाणी पिण्यायोग्य आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासन या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या स्वच्छतेबाबत उदासीन का आहे, असेही रेल्वे प्रवासी विचारत आहेत.

मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाजवळ एकीकडे समुद्रकिनारा आहे तर दुसरीकडे वानखडे स्टेडियम असल्याने मोठ्या संख्यने पर्यटक आणि रेल्वे प्रवाशांची या रेल्वे स्थानकाकडे वर्दळ असते. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वेकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही. कुर्ला रेल्वे स्थानकाचे प्रकरण ताजे असताना मरीन लाईन्स रेल्वे स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या स्वच्छतेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ च्या दक्षिणेच्या दिशेनेे रेल्वेची पाण्याची टाकी आणि पंप रूम आहे. या टाकीचे पाणी मरीन लाईन्स रेल्वे सथानकावरील उपहार गृह, रेल्वे कर्मचार्‍यांचे कार्यालय आणि स्थानकांवरील पाणपोईला जाते. त्यामुळे या पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी हा महत्त्वाचा मुद्दा असून, याची जबाबदारी पश्चिम रेल्वे अधिकार्‍यांची आहे, परंतु या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत आहे. पंप रूमच्या दारासमोर आणि पंप रूमच्या मागे पिण्याच्या टाकीवर अज्ञात व्यक्ती आणि गर्दुले यांच्याकडून लघुशंका आणि शौच केले जाते, तसेच टाकीवर कचराही टाकला जातो. विशेष म्हणजे पाण्याच्या टाकीवरच्या स्लॅबवर पाण्याचा अंदाज घेण्यासाठी एक खड्डा आहे. तो खड्डा उघडा असल्याने गर्दुले त्यात आंघोळ आणि कपडे धुतात. या टाकीतील पाणी काढून या पाण्याचा वापर करतात. त्यामुळे या टाकीतील पाणी प्रदूषित होत आहे.

- Advertisement -

प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळणे थांबवा
यासंबंधी अनेकदा रेल्वेच्या इंजिनीयर आणि रेल्वे सुरक्षा विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्यावर कारवाई होत नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर येथील पाण्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया मरीन लाईन्स स्थानकावरील रेल्वे कर्मचार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली. तर रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी जो खेळ सुरू केला आहे, तो थांबवावा. पाण्याची टाकी आणि रेल्वे स्थानकावर असलेली पाणपोई यांची स्वच्छता राखावी. मात्र, रेल्वेकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मरीन लाईन्स स्थानकावरून नियमित प्रवास करणारे प्रवासी राकेश यांनी दिली.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -