घरमुंबईCoronavirus Effect - हे बेस्ट झालं! मुंबईच्या प्रदूषणात घट

Coronavirus Effect – हे बेस्ट झालं! मुंबईच्या प्रदूषणात घट

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गर्दी टाळा या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी घरुनच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच मुंबईसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे मुंबईच्या प्रदूषणात लक्षणीय घट झाली असून अनेक भागांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या हवेची नोंद करण्यात आली आहे.

सफर या हवेच्या गुणवत्ता नोंदवणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. करोनाचा संसर्ग पसरु नये आणि रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी सरकारकडून महाराष्ट्रात वर्क फ्रॉम होम आणि ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती असा आदेश प्रत्येक खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. या निमित्ताने मुंबईकरांनी ही संमिश्र प्रतिसाद देत घरुनच काम करण्याचा निर्णय घेतला. याचा सर्वात जास्त चांगला परिणाम झाला तो म्हणजे रस्त्यावरील वाहतूक ५० टक्के कमी झाली आहे. सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीच्या वापरातही ५० टक्के घट झाली आहे.

- Advertisement -

सार्वजनिक बस सेवेत ४० टक्के घट झाली आहे. तर, मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवासी संख्येत ३० ते ४० टक्के घट झाल्याचं वाहतूक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. तर, मेट्रोतील प्रवासी संख्येत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ऐरवी दररोज ३२ लाखांपर्यंत असते. पण, आता १० टक्क्यांनी घट झाली असून २२.२१ लाख एवढी प्रवासी संख्या नोंदवण्यात आली आहे.

मुंबईत लॉक डाऊनची परिस्थिती ओढावू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईकरांनी प्रतिसाद दिला आहे. मुंबईवर आलेले संकट टाळण्यासाठी मुंबईकरांनीच स्वतःच ही खबरदारी घेतली आहे. भांडुप, माझगाव, वरळी, बोरीवली, चेंबूर या भागातील हवेची गुणवत्ता उत्तम आणि समाधानकारक नोंदवण्यात आली आहे. तर, कुलाबा, मालाड, बीकेसी, अंधेरीतील हवा मध्यम दर्जाची आहे. तर, नवी मुंबईत अतिशय वाईट दर्जाची हवा नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

पुढचा दिड आठवडा करोनाच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचा मानला जात असल्याचं सरकारकडून याआधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे, रस्त्यावरील, सार्वजनिक ठिकाणांवरील जेवढी गर्दी टाळता येईल तेवढी टाळण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -