घरमुंबईभूकेच्या धगीवर ठेकेदाराची पोळी

भूकेच्या धगीवर ठेकेदाराची पोळी

Subscribe

ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचे आयआरसीटीसी आदेश

रेल्वेच्या पेंट्रीकारमध्ये प्रवासा दरम्यान खानपान सेवेमध्ये जादा रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे आयआरसीटीसीने पेंट्रीकारमध्ये पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन लावण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, कित्येक रेल्वे गाड्यांमध्ये पीओएस मशिन नाहीत. आणि ज्या गाड्यांमध्ये त्या बसवण्यात आलेल्या आहेत. त्यांची संख्याही खूप कमी आहे. त्यामुळे खानपान सेवा देणार्‍यांकडून भूक लागलेल्या प्रवाशांना वेठीस धरून आपले उखळ पांढरे करून घेतले जात आहे.

ज्या पेंट्रीकार संचालकाकडे पीओएस मशिन नाही, त्याच्याकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. अशी माहिती आयआरसीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. यापूर्वीच पीओएस (पॉस) यंत्रासाठी आयआरसीटीसीने निर्देश जारी केले आहेत. डिजिटल पेमेंट अंतर्गत सर्व रेल्वे स्टेशनमध्ये कामाचे व्यवहार करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाने यापूर्वी जारी केले होते. यामुळे काही दिवसाअगोदर स्टेशनवरील स्टॉल, जनआहार आणि फ्रूट प्लाझासहित इतर सर्व जागी पीओएस मशीनने क्रेडिट व डेबिट कार्डाच्या माध्यमातून प्रवासी पेमेंट करीत आहेत.

- Advertisement -

मात्र, या मशिन्सची संख्या पुरेशी नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. लांबवरचा प्रवास करणार्‍या प्रवासी अनेकदा मोठी कॅश सोबत बाळगणे चोरी तसेच इतर कारणांंमुळे टाळतात. त्यामुळे खाण्याचे पदार्थ घेताना त्यांची मोठी अडचण होते. ही अडचण पाहून एक वर्षाआधीच रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार आयआरसीटीसीने पेंट्रीकारमध्ये पीओएस मशीन लावण्याकरता आदेश दिले होते. त्यातून प्रवासी

स्वाईप मशीनच्या माध्यमातून खानपानाचे बिल अदा करीत होते. यामुळे जादा पैसे वसूल केल्याचे प्रकारही कमी झाले होते. परंतु पेंट्रीकार संचालकांनी स्वाईप मशीन उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसे लक्ष दिले नाही. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. त्यामुळेच आता पेंट्रीकार संचालकांवर पीओएस मशीन न लावल्यास ५० हजार रुपयाचा दंड करण्याचा आदेश आयआरसीटीसीने दिला आहे.

- Advertisement -

कॅशलेस सेवेचा बोजवारा
रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या खानपानची पूर्ण जबाबदारी आयआरसीटीसीकडे दिली आहे. पेंट्रीकारकडून खाण्याच्या पदार्थांसाठी जादा रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे आल्या होत्या. हा प्रकार थांबविण्याकरता कॅशलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पूर्वी पीओएएस मशीन सेवेची सुरुवात काही झोनमध्ये करण्यात आली होती. मात्र, मध्य रेल्वे आणि दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोनच्या गाड्यांमध्ये अद्याप ही सेवा सुरू करण्यात आलेली नाही.

गाड्या ७६ पीओएस मशिन्स केवळ २३४
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण ७६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये सरासरी २३४ पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन्स आहेत. या मशिन घेतल्या जात असताना काही नियम आणि अटी घालून देण्यात आल्या होत्या. परंतु पेंट्रीकारचे ठेकेदार दिलेल्या कामात टिकत नाहीत. त्यामुळे बहुतांशी ठेकेदार पीओएस मशीन ठेवण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ही मशीन घेण्यासाठी पूर्वी २५ हजार रुपये द्यावे लागत होते. त्यामुळे ठेकेदार ही मशीन घेण्यासाठी नाखुश असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकार्‍याने दिली.

या विषयी आम्हाला अद्यापही कोणतेही आदेश संबंधित कार्यालयाकडून आलेले नाहीत. असे आदेश जेव्हा येतील तेव्हा आम्ही कारवाई करू.
– पिनाकीन मोरावाला, प्रकल्प संचालक, आयआरसीटीसी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -