घरमुंबईवसई-विरारला खड्ड्यांचं ग्रहण, वाहन चालकांना रोजचीच कसरत!

वसई-विरारला खड्ड्यांचं ग्रहण, वाहन चालकांना रोजचीच कसरत!

Subscribe

नालासोपारा-वसई-विरार शहराला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून, नालासोपारा फाटा ते रेल्वे स्थानक आणि विरार जीवदानी परिसरातील सर्वच रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर तब्बल ६ ते ८ इंचाचे खड्डे पडले असल्याने मोठ्या अपघाताची संभावना व्यक्त केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असतानाही संबंधित प्रशासनाने दखल घेतली नसल्याने परिसरातील नागरिकांसह वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

नालासोपारा रेल्वे स्थानक ते नालासोपारा फाटा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. याशिवाय अनेक दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. संपूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापला असल्याने अनेक गाड्या या खड्ड्यांत अडकून पडतात. खड्ड्यांमुळे गाड्यांचे सतत नुकसान होत असल्याने हातात जेमतेम पैसे असलेल्या व्यक्तींचे हाल होत आहेत. आधीच कोरोनामुळे सर्वांची आर्थिक आणि मानसिक स्थिती बिघडलेली आहे. त्यात आता गॅरेजवाल्यांना मागेल ती किंमत देऊन गाड्या दुरुस्त कराव्या लागत असल्याने हातावर घर चालवणार्‍या गाडीचालक आणि मालकांच्या मुलाबाळांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने वेळीच या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत आणावा, अशी मागणी वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, विरार-जीवदानीचा पायथा, पाच पायरी रोड आणि आजूबाजूचा परिसर, चंदनसार रोड आणि अन्य सर्वच रस्त्यांची अशीच अवस्था आहे. दिवसभर या रस्त्यावरून पाण्याचे टँकर, विटा-रेतीचे ट्रक धावत असल्याने इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या खड्ड्यांमुळे दुर्घटना घडू नये म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक वाहन चालकांना इशारा म्हणून खड्ड्यांत झाडांच्या फांद्या रोवून ठेवत आहेत.

वसई-विरार महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीतील या रस्त्याची दरवर्षी दुरुस्ती करणे अपेक्षित असते. या कामासाठी संबंधित प्रशासनाने ठेकेदारही नियुक्त केलेले आहेत. मात्र त्यानंतरही तात्पुरती मलमपट्टी केल्यानंतर ठेकेदारांची बिलं काढली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर्षी कोविडचे कारण पुढे करून खड्डे दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे नागरिकांना याच खड्ड्यांतून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -